मतदान यंत्रात घोळः कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सात कर्मचारी निलंबित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३ अ मध्ये मतमोजणी करतेवेळी एका कें्रदातील मतदान यंत्रावर एका उमेदवाराचे नाव नोटा चे चिन्ह नसल्याच्या लक्षात आले. याप्रकरणी उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर मतदान प्रक्रियेत असलेले सात अधिकारी व कर्मचारी यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे व सहा. निवडणूक अधिकारी तथा भंडारा नगरपालिकेची मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे.

प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार करूणा राऊत नगरसेवक पदाच्या उमेदवार होत्या. मात्र मतमोजणी करतांना एका बॅलेट युनिटवर त्यांचे नाव व नोटा चे बटन नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आक्षेप घेवून निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद भंडारा यांचेकडे आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या निलंबन आदेशानुसार, प्रभाग क्र. ३ अ मधील मतदान केंद्र क्रमांक १ मधील मतमोजणी प्रक्रियेदरम्यान गंभीर तांत्रिक चूक निदर्शनास आली आहे. सदस्य ३’ अ’ पदासाठी एकूण ५ उमेदवार व १ नोटा असे ६ पर्याय असणे आवश्यक असताना, मतदान यंत्र तयार करताना उमेदवार क्र. ५ व ६ ची नावे झाकली गेल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केवळ ४ उमेदवारांसाठीच उपलब्ध करून देण्यात आले असल्यामुळे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची नावे कळविण्यात आले होते.

सदर विषयाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची नावे या कार्यालयास प्राप्त झाली असून भंडारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नियुक्त मतदान यंत्र तयार करणारे तसेच सदरचे साहित्य मतदान केंद्रावर पोहचविणारे अधिकारी/कर्मचारी यांनी निवडणूक साहित्याची जुळवाजुळव आणि तपासणी करताना आपल्या शासकीयकर्तव्यात जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे कसूर केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्यामुळे भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी सात अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार स्वतंत्रपणे विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल. निलंबन कालावधीत संबंधितांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा हे राहील. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

निलंबन काळात त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीय पदमुक्तता काळ, परकीय सेवा आणि निलंबन, बडतर्फी व काढले जाणे या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम६८ नुसार नियत दराने निर्वाह भत्ता देय राहील. निलंबन कालावधीत संबंधितांनी कोणत्याही खाजगी नोकरीत किंवा व्यवसायात सहभाग घेऊ नये, अन्यथा त्यांचा निर्वाह भत्ता बंद करण्यात येईल असेही दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशात नमुद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *