विजय मिरवणुकीनंतर तुमसरात तणाव
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान नेहरू नगर परिसरात वाद निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झाल्याची घटना रविवारी (दि. २१ डिसेंबर) सायंकाळी घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, तुमसर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेहरू नगर येथील रहिवासी सौ. शिल्पा प्रवेश नखाते (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विजय मिरवणूक सुरू असताना पंकज वसंतराव बालपांडे यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरात प्रवेश करून मारहाण, केस ओढणे, अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वेळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून त्यांना वाचविल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विजय मिरवणुकीदरम्यान प्रतिआरोप
दुसऱ्या बाजूने सौ. जोत्सना पंकज बालपांडे (वय ३९) यांनी दिलेल्या तक्रारीत, विजय मिरवणुकीदरम्यान वर्षा विक्रम लांजेवार, विक्रम लांजेवार व यादवराव लांजेवार यांच्याकडून शिवीगाळ, अंगावर वस्तू फेकणे तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही नागरिकांनाही याचा त्रास झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर दोन्ही बाजूंचे नातेवाईक व समर्थक मोठ्या संख्येने तुमसर पोलिस ठाण्यात जमा झाले होते. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दोन्ही तक्रारींच्या आधारे भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.







