एआयच्या भन्नाट मदतीने जंगलातले वन्य प्राणी थेट सोरनाच्या शाळेत
राहुल डोंगरे, तुमसर (दै. लोकजन):- वर्ग खोलीतील बाकावर बसून अध्ययन करणारे विद्यार्थी आता चक्क वाघ, जिराफ आणि हत्तीवर बसून जंगलाची सफारी करीत आहेत, एक चिमुकला विद्यार्थी ब्लॅक पँथरला वर्गखोलीत घेऊन येतो तर एक माकडासोबत धमाल मस्ती करतो, फुलपाखराचे पंख लाभलेली एक विद्यार्थिनी आकाशात झेप घेते तर एक विद्यार्थी चंद्रावर पाऊल ठेवताच भारावून जातो, एक चिमुकला वाघाला विचारतो ‘व्हॉट इज युअर नेम’.. आणि वाघ त्याला उत्तर देतो, ‘माय नेम इज टायगर’! विश्वास नाही बसत ना. हो, शहरी भागातील नाही तर ग्रामीण भागातील शाळेत हे सर्व घडत आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल सोरना जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने ही भन्नाट कल्पना साकारली आणि एआयच्या मदतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या आभासी दुनियाची सफर करून आणली. सध्याच्या काळात एआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनचअधिकाधिक तंत्रज्ञानभिमुख शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. शाळेतील वर्ग त्याच्या पारंपरिक सीमांच्या पलीकडे विकसित होत आहेत. जगभरातील शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रवेश करत असताना, अध्यापन आणि शिक्षणात एक मूलभूत परिवर्तन घडत आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानाचे धडे आजच गिरवण्यासाठी एका जिल्हा परिषद शाळेने अनोखा पुढाकार घेत प्राथमिक शिक्षणात नवा आदर्श निर्माण केला आहे. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन रंजक व्हावे, प्राण्याची ओळख व इतर बाबीची ओळख व्हावी, ते त्यांच्या स्मरणात चिरकाल रहावे हा हेतू समोर ठेवून एआय तंत्रज्ञानाचा वापरले करून जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने भन्नाट असा व्हिडिओ तयार केला आहे. ज्यात विद्यार्थी जंगलातप्राण्यासोबत खेळताना, त्यांच्यावर बसून जंगल सफारी करताना व संवाद साधताना दिसत आहे. तसेच चंद्रावर माणूस चालल्यास कशाप्रकारे दिसते ह्याबाबत सुद्धा व्हिडिओ तयार केली आहे. काही विद्यार्थी आकाशात उडताना तर काही अंतराळाची सैर करताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नव्या युगाचे दालन खुले झाले असून पालकही विद्यार्थ्यांचे हे व्हिडिओ बघून भारावून गेले आहेत. शिक्षणासाठी तुमसर तालुक्यातील नावारूपास आलेली सोरना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजच्या घडीला टेक्नॉलॉजीचा हब झाली आहे.
या शाळेतील सहाय्यक शिक्षक कैलास चव्हाण ह्यांनी ही अनोखी कल्पना साकारून विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षण सुरू केले आहे. कैलास चव्हाण यांनी ह्यापूर्वी सुद्धा अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून मागिल चार ते पाच वर्षांत शाळेत विविध उपक्रमांद्वारे डिजिटल शिक्षणाद्वारे आणी पालक सहभागातून शाळेत आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत.या शाळेला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियाना अंतर्गत तालुक्यातुन प्रथम तर मागिल वर्षी जिल्हयातुन व्दितीय क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे.या पुरस्काराच्या रक्कमेतून विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे टॅब, एलसिडी पॅनल घेण्यात आले आहे येथिल विद्यार्थी सुट बुट टाय लावुन शाळेत येतात त्यामुळेच पालकांना येथिल जिल्हा परिषद शाळेविषयी विश्वास वाढला आहे.









