मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम पिचवर भाजपची विजयी घौडदौड; काँग्रेस खासदाराच्या प्रभागातच धोबीपछाड, नागपुरातील चुरशीच्या लढाईत कुणाची बाजी?
नागपूरः- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उपराजधानी नागपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. यात २७ पैकी २१ नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेसह भाजपसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील निवडणुकीत भाजपने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
सध्या ठीकठिकाणी मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध मतमोजणी केंद्रातून भाजपचे विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जल्लोष करत बाहेर पडत आहे. एकूणच या विजयाने आगामी निवडणुकांसाठी भाजपचा विश्वास दुणावला आहे. पुढे आलेल्या पहिल्या कलानुसार २७ नगरपरिषदेत भाजपने नागपुरात २१ जागांवर, तर शिंदेंच्या शिवसेनेनं २ जागी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस अवघ्या ३ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शप गट) आणि ठाकरेंच्या शिवसेनेला अद्याप खातेही उघडता आलेलंनाहीये. दुसरीकडे शेकापानं एका जागी विजय मिळवला आहे.









