तुमसरचा “निकाल’ नामा: सागर गभने नगराध्यक्षपदी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार सागर गभने यांनी ७,७५८ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी पक्षादेश झुगारून दिलेल्या समर्थनामुळे या विजयाला “राजकीय बंडाचा विजय’ मानले जात असून, शहरात बदलाची लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण २५ जागांपैकी भाजपा १०, राष्ट्रवादी (अपक्ष गट) १०, काँग्रेस ३, शिवसेना (शिंदे गट)१ आणि अपक्ष १ असे चित्र समोर आले आहे. आता सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार आणि फोडाफोडीचे राजकारण रंगणार की विकासाची युती होणार, याकडे संपूर्ण तुमसरचे लक्ष लागले आहे.







