शिक्षक नियुक्ती व मुख्याध्यापक पदोन्नती घोटाळ्याची चौकशी सुरू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यात गाजलेल्या शिक्षक भरती व मुख्याध्यापक पदोन्नती घोटाळ्याचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यातून पुढे सरकू लागले असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) येथील शिक्षण विभागाकडील सर्व संबंधित फाइल्स नागपूर येथे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शिक्षक मान्यता व मुख्याध्यापक पदोन्नतीच्या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रांसह नागपूरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात तसेच संस्थाचालकांमध्ये एकचखळबळ उडाली आहे. राज्यात नियमबाह्य पद्धतीने शिक्षक पदांची भरती व मुख्याध्यापक पदोन्नती झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण शिक्षण विभागाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती.
या प्रकरणाची सुरुवात भंडारा जिल्ह्यातून झाल्याची चर्चा राज्यभर रंगली होती. सहा महिन्यांपूर्वी शिक्षक भरती व मुख्याध्यापक नियुक्तीतील अनियमितता उघडकीस आल्यानंतर हा विषय विधिमंडळातही गाजला होता. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिवाळी अधिवेशनात एसआयटीचा सविस्तर अहवाल सादर केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या विषयावर ठोस चर्चा न झाल्याने एसआयटीचा तपास कासवगतीने सुरू असल्याची भावना शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत होती. दरम्यान, आता एसआयटीने थेट भंडारा जिल्ह्याच्या शिक्षणविभागातील फाइल्स मागविल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नती, नियुक्ती आदेश, प्रस्ताव व संबंधित पत्रव्यवहाराची कसून तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रकरणातील नियमपालन, वरिष्ठांची मंजुरी व शासन निर्णयांचा अभ्यास एसआयटीकडून केला जाणार आहे. विशेष म्हणजे, २०१६ ते २०१९ या कालावधीत राज्य शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली असतानाही भंडारा जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तींना मोठ्या प्रमाणावर मान्यता देण्यात आली. या मान्यता नियमबाह्य असल्याचा आरोप असून, संबंधित शिक्षक आजही जिल्ह्यातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत कार्यरत आहेत. एसआयटीकडून प्रत्येक फाइलचा बारकाईने अभ्यास केला जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शिक्षण विभाग,संस्थाचालक व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.







