ओबीसी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सतत ओबीसी, एनटी, व्ही जे, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या धोरणाचे दर्शन ओबीसी मुलांच्या वस्तीगृहात भेट दिल्यावर लक्षात येते. परंतु शिक्षणासाठी व आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वतःच्या घरापासून दूर राहणारे वसतिगृहातील विद्यार्थी जेव्हा न्याय मागण्यासाठी दारोदार फिरतात तेव्हा व्यवस्थेबद्दल संताप आल्याशिवाय राहत नाही. असा अनुभव काल भंडारा येथे आला आहे. विभागिय विद्यार्थी /कर्मचारी सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२५ यात वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी होण्यासाठी सूचना निघाली. विद्यार्थी तयारीला लागले, काही साहित्य व सुविधा आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने तयार केल्या. ऐनवेळी वरुन सूचना आली महोत्सवात सहभागी व्हायचं तर प्रती विद्यार्थी चारशे रुपये जमा करावे. आधी च विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निर्वाह भत्ता नेहमीच उशिरा मिळत असतांना, आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर हा थेट अन्यायच नाही का? वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके व क्रीडा साहित्याकरिता कोणतेही निधी उपलब्ध नाही मग ओबीसी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल?

ओबीसी,एनटी विद्यार्थ्यांची प्रतारणा शासनाने त्वरित थांबवावी

अन्य विभाद्वारे चालवली जाणारी वस्तीगृह सर्व सुविधांनी परिपूर्ण असतात मग इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आपल्या विद्यार्थ्यांप्रती इतका उदासीन का आहे. या विद्यार्थ्यांशी असा सावत्र व्यवहार करुन काय साध्य होणार आहे. आधीच संख्येने अधिक असूनही त्यांच्या साठी जिल्ह्यात फक्त एक वस्तीगृह निर्माण केले. तेही भाड्याने घेतलेल्या इमारतीत असल्याने सुविधांचा अभाव आहे, जेवणाची सुविधा नाही, ग्रंथालय नाही, इंटरनेट नाही, पाण्याची समस्या, कधी पीओपी पडतो तर अशा अनेक अडचणी असतांना त्यांच्या कडे शासन लक्ष देत नाही हिच मोठी समस्या झाली आहे. काल असे विद्यार्थी आपल्या प्रतिनिधींना सांगण्यासाठी बाहेर पडले. हे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. आतातरी शासनाने याकडे लक्ष द्यावे. विद्यार्थी निश्चिंत होवून आपल्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे असे निवेदन, मा. खासदार प्रशांत पडोळे, मा. आमदार नरेंद्र भोंडेकर, मा. सावन कुमार साहेब जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले. जर विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध झाली नाही तर ते कोणत्याही स्पर्धेत कसे भाग घेतील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *