आदिवासीबहुल भागातील ६ किलोमीटरचा रस्ता चार महिन्यात उखडला

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, सातपुडा पर्वतरांगातील आदिवासीबहुल लेंडे़डझरी ते गायमुख या गावांना जोडणारा ६ किलोमीटरचा रस्ता अवघ्या चार महिन्यांतच खड्डेमय झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मोठ्या निधीतून हा रस्ता बांधला असताना, इतक्या अल्प कालावधीतच रस्त्याची अवस्था बिकट होणे म्हणजे बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

विशेष म्हणजे या मार्गावर जड वाहतुकीचा वापर नसल्याचे सांगितले जाते. तरीदेखील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकीवाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आदिवासीबहुल गावांना जोडणारे रस्ते पक्के व मजबूत असावेत, या उद्देशाने शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला गेला; प्रत्यक्षात मात्र हा निधी निकृष्ट कामात वाया गेला काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

देखरेख असूनही गुणवत्ता ढासळली कशी?

रस्त्याच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा विभागाचे अधिकारी देखरेख व नियंत्रणासाठी नेमलेले असतात. असे असतानाही चार महिन्यांतच रस्त्याची गुणवत्ता का घसरली? काम करताना निकष पाळले गेले का?साहित्य दर्जेदार होते का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

खड्डे पडल्यावर तातडीने दुरुस्ती करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाने घेतलेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष

जंगलव्याप्त व आदिवासीबहुल परिसरातील रस्ते धोकादायक बनत असताना प्रशासनाचे लक्ष नाही काय, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. शासनाचा निधी पाण्यात गेला का, केवळ कागदोपत्रीच विकास दाखवला जात आहे का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

मंत्रालयापासून गावापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण साखळी कार्यरत असताना, कोट्यवधी रुपयांचा खर्च पगारावर होतो. मात्र कर्तव्यात चुकारपणा होत असल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी केली आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली निधीचा अपव्यय सुरूच राहील हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *