सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने संतप्त शेतकरी गोसेखुर्द प्रकल्प कार्यालयावर धडकले

दै. लोकजन वुत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्पामुळे अनेक भागात नहाराद्वारे शेतीसाठी पाणी सोडल्या जात असल्याने उन्हाळी धानाचे पिक घेण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे. परंतु, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ गोसेखुर्द प्रकल्पाच्या गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या अनियोजीत कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. अशाच शेतकऱ्यांनी सोमवारला गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या आंबाडी येथील कार्यालयावर धडक दिली. यावेळी सबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. गोसेखुर्द प्रकल्पाच्या नेरला उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी दिल्या जात असलेल्या लाखांदुर तालुक्यातील पेंढरी (सो.), तिरखुरी, हरदोली, सोनेगाव या भागात उन्हाळी धान पिकाच्या लागवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सध्या धानाच्या नर्सरीसाठी पाण्याची अंत्यंत आवश्यकता असल्याने १ जानेवारी रोजी पाणी सोडण्याची मागणी सबंधीत शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार सबंधीत अधिकाऱ्यांनी नहराला पाणी सोडले. परंतु, सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचु न देता पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ४०-५० शेतकऱ्यांनी थेट आंबाडीचे कार्यालय गाठुन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांची वैफियत ऐकुन सिंचनासाठी पाणी सोडुन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही तो पर्यंत पाणी सुरु राहील, असे आश्वासनदिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपली आंदोलनात्मक भुमिका मागे घेतली. यावेळी गोपाल रोहनकर, विलास दहेलकर, केशव रोहनकर, प्रदीप शेंडे, भास्कर रोहनकर, नाशिक मेश्राम, गुलाब मेश्राम, दादा रोहनकर, मछिंद्र शेंडे, पुण्यवान मेश्राम, नरेश भोयर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *