आमदार डॉ. परिणय फुके यांनी परिषदेत उचलला मुद्दा पर्यावरण विभागाकडून चुकीच्या माहितीवर संताप
गोंदिया :- नाग नदीतील प्रदूषित पाण्याने वैनगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या वैनगंगेचे पाणी भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पिण्यासाठी दिले जाते. या जिल्ह्यातील गावांतील पाण्याची कधीही प्रशासनाने तपासणी केली नाही. याच धरणाचे पाणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला दिले जाते. एवढेच नव्हे भविष्यात राज्य सरकारकडून प्रस्तावित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून नरखेड, काटोलसारख्या गावांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाग नदीच्या प्रदूषित पाण्यावर लक्ष वेधत आहे. परंतु आजपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यातच आज पर्यावरण विभागाने चुकीची माहिती दिल्यावर संताप व्यक्त करीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनावर जोरदार प्रहार केला. नाग नदीतील प्रदूषित पाणी व त्यामुळे फटका बसलेल्याजिल्ह्यांबाबत परिषदेत लक्षवेधीद्वारे डॉ. परिणय फुके यांनी मुद्दा लावून धरला. पर्यावरण विभागाने दिलेल्या उत्तरावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केले की, शासनाचे स्पष्टीकरण वास्तविक परिस्थितीपासून दूर असून नाग नदीच्या प्रदूषणाच्या भीषणतेचे गांभीर्य लक्षात न घेणारे आहे.
डॉ. फुके म्हणाले, नदीतील चांगल्या पाण्याची बीओडी ३ एमजी प्रती लिटर असते तर नाग नदीतील पाण्याची बीओडी तब्बल २८.८ एमजी प्रति लिटर आहे. या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन जवळपास शून्य असतो. त्यामुळे ही नदी “गटार’ बनली आहे. हे शासनानेच मान्य केले आहे.तरीदेखील “मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम नाही’ आणि “जनावरांवर विपरीत परिणाम नाही’ असा दावा करणे म्हणजे वास्तवाला नाकारण्यासारखे आहे, असा जोरदार प्रहार डॉ. फुके यांनी केला.
शासनाने नाग नदीतील पाण्याबाबत तक्रार नाही असे सांगून समस्येचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. लोकांनी तक्रार केली तरच समस्या नाही, हा युक्तिवाद चुकीचा आहे. शासनाने स्वतःहून वैज्ञानिक सर्व्हे करणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले. विभाग म्हणतो की, १३ एसटीपी सुरू केली. प्रत्यक्षात दोनच एसटीपी सुरू आहेत. याशिवाय जवळपास ८०० ते ८५० एमएलडी सांडपाणी नाग नदीतजाते. मात्र ही आकडेवारीही कमी दाखवण्यात आली आहे, यावर डॉ. फुके यांनी संताप व्यक्त केला.









