बनावट नंबर प्लेट व दुसऱ्या वाहनाचा ई. टी. पी. वापरून रेतीची वाहतूक

दै. लोकजन वृत्तसेवा-भंडारा :- बनावट नंबर प्लेट व दुसऱ्या वाहनांची ई.टी.पी. वापरून रेतीची वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा करडी पोलिसांनी भांडफोड़ केला. तीन टिप्पर चालक व मालकांचेवर कारवाई करून ३८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल करडी पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई तिरोडा-तुमसर रोडवर देहवाडा खुर्द येथे नायरा पेट्रोलपंपाजवळ केली. करडी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धर्तीच्या रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर असे की, करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गोरखनाथ उखडूसिंग नागलोत हे स्टॉफसह पेट्रोलिंग करीत होते.तेव्हा त्यांना टिप्पर क्र. एमएच ४० सीटी ६६००, एमएच ४० बीएल ७२२०, एमएच ४० सीटी ९०६३ मध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती दिसून आल्याने त्यांनी तिन्ही टिप्पर थांबविले. टिप्पर क्र. एमएच सीटी ६६०० चा चालक जयेंद्र भिकारी ठाकूर (वय ४६) रा. कन्हान ता. पारशिवनी जि. नागपूर याने रेती वाहतुकीबाबत ईटीपी नं २७१९६.३२६ दाखवून परवाना असल्याबाबत सांगितले. तसेच टिप्पर एमएच ४० बीएल ७२२० चा चालक रोहीत तोफसिंग चव्हाण (वय २१) रा. कन्हान ता. पारशिवनी याने रेती वाहतुकीबाबत ईटीपी नं २७१९६३६१४ दाखविला. टिप्पर क्र. एमएच ४० सीटी ९०६३ चा चालक योगेश वसंता उईके (वय ३५) रा. कन्हान ता.पारशिवनी जि. नागपूर याने रेती वाहतुकी बाबत ईटीपी नं २७१९६३६१४ दाखविले.

सदर वाहनावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही करणे असल्याने त्यांनी तिन्ही टिप्पर पोलिस स्टेशन करडी येथे डिटेन करून ठेवले. दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी उपरोक्त तिन्ही टिप्परचे चालकांनी पोलिस स्टेशन करडी येथे हजर येऊन तिन्ही वाहनांची छायांकित कागदपत्रे सादर केली. तिन्ही टिप्परचे कागदपत्रानुसार चेसीज नंबर चेक केले असता वाहनाचे बॉडी वरील चेसीज नंबर व कागदपत्रावरील चेसीज नंबर मध्ये तफावत दिसून आली. चालक मालकांनी संगणमत करून आर्थिक फायद्याकरिता शासनाची फसवणुकीच्या उद्देशाने आपले वाहनांची नंबर प्लेटमध्ये बनावटीकरण करून मूळ नंबर बदलला तसेच रेती वाहतुकी करिता शासनाने अधिकृत केलेल्या परवान्यामध्ये बनावट व फेरफार करून दुसऱ्या वाहनांचे रेती परवाना वापरून शासनाची फसवणुक केली.

तिन्ही टिप्परचे मालक व चालक यांच्यावर पोलीस स्टेशन करडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे हे करीत आहेत. टिप्पर व रेती असा एकूण १ कोटी ३६ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यांमध्ये अजून इतर आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,

उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांचे मार्गदर्शनाखाली करडीचे ठाणेदार गोरखनाथ नागललोत, पोउपनि हनुमंत फरताडे, हवालदार मडावी, चालक कावळे, शिपाई बोपचे यांनी केली.

अवैध धंद्यावाल्यांसाठी ठाणेदार गौरक्षनाथ नागललोत ठरले कर्दनकाळ

सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरक्षनाथ नागललोत यांनी सहा महिन्यांपूर्वी करडी पोलीस स्टेशन ठाणेदाराचा पदभार सांभाळला तेव्हापासून सतत अवैध धंद्यावर आळा घालत असल्याने परिसरातील अवैध धंदे बंद झाले आहेत. दुसऱ्या जिल्ह्यातून अवैध रेती वाहतूक होत असल्यामुळे दिवस रात्र गस्ती करून टिप्पर चालक व मालकांवर कारवाई करीत आहेत. यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. आजपर्यंत करडी पोलीस स्टेशन अंतर्गत एकही आरोपीला तडीपार करण्यात आले नव्हते. परंतु, ठाणेदार गौरक्षनाथ नागललोत यांनी तीन ते चार गुन्हे नोंद असलेल्या आरोपीला तडीपार केले. करडी परिसरात अवैध धंदे, अवैध रेती वाहतूक पुर्णतः बंद झालेली आहे. अवैध धंद्यावाल्यांसाठी ठाणेदार नागललोत हे कर्दनकाळ ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *