भाजपाला जे सोडून गेले ते गद्दार होते; भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे व जॅकी रावलानी यांचा आरोप

भंडारा :- भाजपाचा ज्यांनी राजीनामा दिला ते भाजपाचे कधीच निष्ठावान नव्हते. पूर्वीपासूनच ते आमदार भोंडेकर यांचेसोबत मिळून होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव त्यांच्यामुळेच झाला. त्या सर्वांचा राजीनामा एकाच ठिकाणी लिहिण्यात आला व पैसे देवून त्यांना राजीनामा पत्रावर सही करण्यास दडपण आणण्यात आले. असा आरोप भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे व जॅकी रावलानी यांनी केला. यावेळी मयुर बिसेन, नितीन कारेमोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जॅकी रावलानी यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या घोटाळ्याचा पाढाच सांगितला. ते म्हणाले, आ. भोंडेकर यांनी स्वतःच्या सिरसी येथील कॉलेजमधील खासगी रस्ते आमदार फंड व मायनिंग विभागाच्या निधीतून बनविले आहेत. १ कोटी ५० लक्ष रुपये आमदार फंडातील वापरले, याची तक्रार लवकरच वरीष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात येणार आहे. महिला रुग्णालयाचे २८ कोटी रुपयाचे साहित्य खरेदी करण्यात आले. यात ३० टक्के कमिशन आमदाराने घेतला. पूर्ण साहित्य सुद्धा आणण्यात आले नाहीत. जिल्हा शल्य चिकित्सकाने नियमबाह्यपणे कंत्राट मंजूर केला. यासह बरेच घोटाळ्याची माहिती आपल्याकडे आहे. ते लवकरच उघडकीस येतील असेही जैकी रावलानी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, राजीनामा दिलेल्या २० पैकी १६ जण भोंडेकरसाठी काम करीत होते. मी शिवसेनेत असतांना स्वतः पैसे दिले आहेत. त्यांनीच भाजप बुथ प्रमुख व शक्ती प्रमुखाचे नाव शिवसेनेकडे दिले होते. भोंडेकर सोबत ते आजही मिळून काम करीत आहेत.  सुनील मेंढे नगराध्यक्ष असताना त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचणारे तेच होते. अंदरचे गद्दार धोकादायक ठरतात. पक्षासोबत गद्दारी करणारे सोडून गेले असेही ते म्हणाले.

जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे म्हणाले, आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. पण ते पक्ष सोडून गेले नाही. याचा फायदा त्यांना झाला. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनले. आज राज्यात दोन नंबरचे मंत्री आहेत. आमदाराच्या माध्यमातून पैसे घ्या आणि राजीनामा द्या, ही मोहिम राबविण्यात आली. त्यासाठी प्रत्येकांना पाच लाख रुपये दिले. ३ करोडची गाडी त्याच्याकडे आली कोठून? एवढे पैसे आले कोठून? आमदारांच्या भ्रष्टाचारावर विरोधक गप्प का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर आरोप केला त्यांनी स्वतःचे कर्तृत्व पहावे व नंतरच दुसऱ्यांवर आरोप करावे. त्यांची आमच्या नेत्यांवर आरोप करण्याची कोणतीही लायकी नाही असेही आशू कोंडाणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *