साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी!
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- जिल्हाधिकारी सावन कुमार व पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्ट्राँग रूम, मतदान केंद्रे व मतमोजणी प्रक्रियेची तपशीलवार समीक्षा; शांततेत आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी कठोर निर्देश साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी साकोली तहसील कार्यालयात सविस्तर पाहणी व आढावा बैठक घेतली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, सुरक्षा आणि शिस्तबद्ध कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत सर्व संबंधित विभागांकडून माहिती घेतली.
बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी स्ट्राँग रूमची पाहणी, मतदान यंत्रांची तयारी, मतदान साहित्याचे वितरण-स्वीकृती, तसेच मतदान केंद्रांची तपासणी याबाबत संपूर्ण माहिती घेतली. मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा, प्रवेश नियंत्रण, सीसीटीव्ही देखरेख, आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती या सर्व विषयांचे परीक्षण करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी स्पष्ट केले की निवडणूक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना, निष्पक्ष आणि सुरक्षित पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त, गस्त वाढविणे, संवेदनशील मतदान केंद्रांची विशेष यादी, आणि अतिरिक्त सुरक्षा उपाय त्वरित लागू करण्यात यावेत.
मतदानादिवशी सुरळीत वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, तसेच आपत्कालीन प्रतिसाद पथकाची तयारी यावरही त्यांनी भर दिला. या पाहणीदरम्यान एसडीपीओ शिवम विसापूरे, निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार निलेश कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश वासेकर, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवत शांततेत, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांना साजेशी निवडणूक पार पाडण्याचा निर्धार व्यक्त झाला.









