जैविक वैद्यकीय कचरा फेकणारे ते बेजबाबदार कोण?
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ग्रामीण भागासह शहरात स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि “स्वच्छता’चा गाजावाजा करणारे अधिकारी यांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे. साकोली-लाखांदूर रोडवरील वडद फाट्याजवळ मागील दहा दिवसांपासून पाच ते सहा पोती बायो-मेडिकल कचरा उघड्यावर पडलेला असून, सुया, रक्तदूषित कापड, औषधे, सिरिंज, रसायने अशा धोकादायक वस्तूंचा मोठा साठा रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला तरीही तालुका आरोग्य विभाग, संबंधित प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही, ही सर्वांत चिंताजनक बाब. लोकांच्या आरोग्याशी सरळ खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हा कचरा नेमक्याकोणत्या दवाखान्यातून किंवा आरोग्य संस्थेतून फेकला गेला हा प्रश्न सध्या केंद्रस्थानी आहे. वडद फाटा परिसरात, मुख्य महामार्गापासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावर, अगदी रस्त्यालगत हा धोकादायक कचरा बेजबाबदारपणे फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग आमदार नाना पटोले यांच्या मूळ गाव सुकळीला जाणारा मुख्य मार्ग असूनही कोणत्याही अधिकाऱ्याच्या नजरेस हा प्रकार न पडणे आश्चर्यकारक. सुया, रक्तमिश्रित पट्ट्या, तीक्ष्ण वैद्यकीय साहित्य, औषधी कचरा आणि इतर संसर्गजन्य वस्तूंमुळे हा कचरा गंभीर आरोग्यधोका निर्माण करत आहे.
मानवाला इजा पोहोचवणाऱ्या वस्तूंमुळे संक्रमणाचा धोका वाढतो आणि परिसरातील वन्यजीव, पाळीव पशु ते मानवांपर्यंत संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक आहे. बायो-मेडिकल कचरा व्यवस्थापनासाठी स्पष्ट आणि कठोर नियम असताना त्याकडे इतक्या उघडपणे दुर्लक्ष केले जाणे ही प्रशासनिक पातळीवरील मोठी चूक मानली जाते. रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये निर्मित कचरा रंगनिहाय डब्यांमध्ये वर्गीकृत करून, झाकलेल्या ट्रॉलींमधून सुरक्षितरित्या वाहतूक करून, निश्चित जागी साठवून नंतर ऑटोक्लेव्ह, कचऱ्याचे भस्मिकरण किंवा सुरक्षित लँडफिलद्वारे विल्हेवाट लावणे बंधनकारक असते. पण वडद फाट्यावर उघड्यावर टाकलेला हा कचरा पाहाता, संबंधित दवाखान्यांनी आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेने नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट होते.
हे सरळसरळ पर्यावरणीय गुन्हा असून, अशा कृत्याने संपूर्ण तालुक्यात संसर्गजन्य रोग पसरू शकतात. घटनेची माहिती तालुका आरोग्य विभागाला न मिळणे किंवा मिळूनही कारवाई न होणे, ही दोन्ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गडद प्रश्नचिन्ह निर्माण करतात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या गंभीर घटनेकडे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील आरोग्य सेवा अधिकारी यांचे दुर्लक्ष हे अत्यंत चिंताजनक आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ व्हायरल होऊनही कोणतीही गतीशील कारवाई न होणे ही बेपर्वाई नव्हे तर निष्काळजीपणाची पराकाष्ठा मानली जात आहे. नागरिक आता या प्रकारामागील दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी करत असून, “स्वच्छता’ च्या नावाखाली लाखो रुपये खर्च करणाऱ्या यंत्रणेचा खरा चेहरा या घटनेने उघडा पाडल्याची चर्चा आहे.









