दिव्यांगाचे हक्क व अधिकार जाणीव-जागृती कार्यशाळ
पवनीः- तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, कुरखेडा आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग व्यक्तींचे अधिकार, हक्क, शासकीय योजना, शासन निर्णयाच्या अनुषंगाने जाणीव-जागृती संवेदनशील कार्यशाळा पवनी तालुक्यात कार्यरत ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आली.
प्रशिक्षण घडवून आणण्यासाठी सक्रीयसहकार्य करणारे गट विकास अधिकारी नितेश माने, दिव्यांग विभाग पंचायत समिती अंकुर नाईक आणि विस्तार अधिकारी पंचायत समिती कल्याणी दवंड यांनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातूनदिव्यांग व्यक्तीच्या योजना तळागाळा पर्यंत पोहचविणे, दिव्यांग व्यक्तीच्या सन्मानार्थ आणि संरक्षणार्थ असलेले कायदे याची माहिती दिव्यांग व्यक्तींना देणे, त्याचप्रमाणे शासन निर्णया विषयी माहिती देणे, दिव्यांग व्यक्तीप्रती समज विकसित करणे आणि सोबत संवेदनशीलता वाढविणे हे आहे.
सर्व प्रथम प्रशिक्षकांनी या कार्यशाळेची गरज समजावून सांगितलीव संस्थेच्या कामाविषयी माहिती दिली. आपण समुदाय आधारित दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन या प्रकल्पा अंतर्गत दिव्यांगांसोबत कशा प्रकारे काम करीत आहोत याची सविस्तर माहिती दिली गेली. सरपंच ग्रामसेवक यांच्यासोबत प्रश्नावली च्या माध्यामातून दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा केली. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ च्या कायद्यांतर्गत २१ प्रकारची माहिती दिली, शासकीय योजना व कायद्यांची माहिती दिली आणि त्याचबरोबर त्यांचे बचत गट आणि संघटना तयार करून त्यांना सक्षम कशा प्रकारे बनविता येईल यावर चर्चा केली.कार्यशाळेमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी गावपातळीवर कशा प्रकारे विविध योजनेच्या माध्यमांनी सहकार्य करता येईल यावर विशेष भर देण्यात आला.
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश आणि गरज हे सांगत असताना त्यामागचे बारकावे समजवून देण्यात आले कि, दिव्यांग व्यक्तीला समजून घेताना प्रथम दिव्यांग व्यक्तीची आणि दिव्यांगत्वाची ओळख करणे, योजनांची माहिती देणे, कायद्याची माहिती देणे, दिव्यांग व्यक्तीच्या मिटिंग घेणे, ग्रामपंचायतीत नोंदणी करणे, दिव्यांग व्यक्तींना सन्मानन्वित करणे, समाजामध्ये दिव्यांग व्यक्तीबद्दल जाणीव-जागृती कार्यक्रम करणे, ५ टक्के निधीचे योग्य वितरण करणे,
दिव्यांग व्यक्तीच्या गरजा/ समस्या समजून घेणे, व्यावसायिक दृष्टीकोन प्रदान करणे, अर्थार्जनाच्या दिशेने त्यांची वाटचाल करणे, प्रमाणपत्र काढण्यासाठी प्राधन्य देणे, सोबतच फील्ड मध्ये काम करीत असताना आपल्याला आलेल्या अनुभवातून आपण समाजात काम करीत असताना कशा प्रकारे अधिक संवेदनशील होऊन दिव्यांगांसाठी काम करू शकतो याबाबतीत समजावून सांगण्यात आले. अशा प्रकारे संवाद साधत कार्यशाळा यशस्वी करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे कार्यकर्ते निधी धुर्वे, प्रीतम नानवटे व छाया तलमले उपस्थित होते.









