नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अजित पवारांची खलबतं मुंबईत
मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. कारण, शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती, त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये, नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले.
दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली. एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले असून अमित शाह यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांचीभेट घेणार आहेत. त्यानंतर, बिहार इथे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे, बिहारमधील एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती आहे.









