लालगुंजीत वास्तव व कल्पनेचा संगम – डॉ. श्याम मोहरकर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लालगुंजी ही कादंबरी संघर्षशील विधवा स्त्रीची कथा आहे. या कादंबरीत वास्तव व कल्पनेचा संगम करण्यात आला आहे. वैनगंगा पट्ट्यातील झाडीबोलीला पुढे आणण्याचा प्रयत्न लालगुंजीच्या माध्यमातून केला आहे असे प्रतिपादन कादंबरीकार डॉ. श्याम मोहरकर यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्याम मोहरकर लिखित कादंबरी लालगुंजीचा प्रकाशन सोहळा इंद्रराज सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह प्रा. सुमंतदेशपांडे हे होते. कादंबरीचे प्रकाशन साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य ॲड. लखनसिंह कटरे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाष्यकार म्हणून डॉ. गिरीश सपाटे, डॉ. संजयकुमार निंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी वाचनालयाच्यावतीने डॉ. श्याम मोहोरकर यांच्या सत्कार करण्यात आला. भाष्यकार डॉ. गिरीश सपाटे यांनी लालगुंजीचा संदर्भ दुष्काळात मिळणाऱ्या लाल मिलोच्या भाकरीशी लावत त्याकाळच्या परिस्थितीचे वर्णन केले. डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी अस्सल झाडीबोलीतील लालगुंजी ही कादंबरी असून यात त्या काळातील आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे समर्थक शब्दात वर्णन करण्यात आल्याचे सांगितले. ॲड. लखनसिंह कटरे यांनी १८ जून १९५१ ला शेतकऱ्यांचे मूलभूत हक्कडावल्यापासून शेती व ग्रामीण भागाची झालेली वाताहात ही आता अशा कादंबऱ्यातूनच शेतकऱ्याचे दुःख मांडू शकतील असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा. सुमंत देशपांडे यांनी लालगुंजी या कादंबरीतील दुर्गा या नायिकेचे संघर्षमय यथार्थ चित्रण डॉ. मोहरकर यांनी केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयश्री सातोकर यांनी केले. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव तर आभार प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. कार्यक्रमाला साहित्यिक अमृत बन्सोड, हर्षल मेश्राम, नीळकंठ रणदिवे, डॉ. के. एल. देशपांडे, विणा मोहरकर, विठ्ठल सार्वे, डॉ. बंधू चौधरी, मनोज केवट, डॉ. ममता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.









