शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- निसर्गाच्या लहरीपणामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटातून निघण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पालोराचे सरपंच सौ. शिल्पा उमेश तुमसरे यांनी केली आहे. करडी, पालोरा परीसरात सिंचनाची सुविधा नाही. परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पान घेतात. अशावेळी शेतकरी फक्त निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतात.
प्रत्येक वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. तरी न खचता ते आशेने आपली शेती कसत असतात. यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला पडल्याने शेतातील धान पाहून शेतकरी आनंदात होता. धानाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा त्यांना होती. मात्रअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या धानाच्या कळपा शेतात साचलेल्या पाण्यात सापडल्याने त्या अंकुरल्या. हातात आलेले सर्व गेले. अशावेळी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे, आपल्या मुलाबाळांचे लग्न कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करील, अशी आशा होती. परंतु, अद्यापपर्यंत शासनाने कोणतीच मदत दिली नाही. शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पालोरा येथील सरपंच शिल्पा तुमसरे यांनी केली आहे.









