प्रचारासाठी पक्षाच्या उमेदवारांना मिळणार नऊ दिवस तर अपक्षांना पाच दिवस
काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन) ः- तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होणारी यंदाची नगरपरिषद निवडणूक राजकीयदृष्टया रंगतदार ठरणार असली तरी, कालावधीचा ताण उमेदवारांची झोप उडवणारा ठरत आहे. या निवडणुकीचा प्रचार कालावधी अवघा नऊ दिवसांचा, तर अपक्ष उमेदवारांसाठी फक्त पाच दिवसांचा असल्याने, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. यंदा निवडणूक कार्यक्रम अत्यंत संक्षिप्त असल्याने, वातावरण निर्मिती आणि मतदार संवादासाठी वेळच नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. १० नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरु झाले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतरच प्रचाराला प्रत्यक्षसुरुवात होणार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक गटबांधणी, प्रचारयोजना आणि मतदारसंवादाची तयारी करतआहेत. मात्र पक्षांकडून अधिकृत ग्रीन सिग्नल न मिळाल्याने बहुतेक जण “वेट ॲण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. अर्ज माघारीची मुदत २१ नोव्हेंबरला संपत असून, त्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी मिळणारा काळ फक्त ९ ते ५ दिवसांदरम्यान आहे. या मर्यादित काळात घरोघरी भेटी, प्रचारसभा आणि सोशल मीडियासमोरील मोहिमा यांचा समतोल राखत मतदारांपर्यंत पोहोचणे, हे उमेदवारांसाठी कठीण समीकरण ठरणार आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे.
प्रमुखराजकीय पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची नावे जवळजवळपास निश्चित केली असली, तरी अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. त्यामुळे शहरात “कोण होणार नगराध्यक्ष?’ हा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रचारासाठी वेळ कमी असला तरी, गाठीभेटी, सोशल मीडिया मोहिमा आणि स्थानिक नेत्यांची शिफारस या वातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाव्य उमेदवारंाचे समर्थक आपापल्या नेत्याला पुढे करण्यासाठी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पक्षचिन्ह न मिळाल्याने खुल्या प्रचाराची परवानगी नसल्याने सर्वजण संयम बाळगून आहेत. काळजीतले उमेदवार आणि उत्सुक मतदार अशा दुहेरी उत्सुकतेत ही निवडणूक हॉटसीटवर विराजमान झाली आहे.







