बाळासाहेब थोरातांच्या चार दशकांच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी; विखे पिता-पुत्रांच्या साथीने पालिकेतही परिवर्तन होणार?
संगमनेर ः- स्वातंत्र्यपूर्व काळात १८६० सालापासून स्थापन झालेल्या संगमनेर नगरपालिकेत गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. या नगरपालिकेत यंदा महायुतीचे आव्हान असणार आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या या पालिकेत दोन टर्म थोरात यांच्या बहीण आणि सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गा तांबे नगराध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने यावेळी महायुतीच्या देखील अपेक्षा उंचावल्या असून विखे पिता-पुत्रांच्या साथीने पालिकेत देखील परिवर्तन करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
काँग्रेस पक्षातून निलंबित असलेले डॉ. सुधीर तांबे व अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबातून नगराध्यक्षपदाचा उमेदवार असण्याची चर्चा असून यावेळी महाविकास आघाडी ऐवजी शहर विकास आघाडीच्यानावाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाईल अशी चर्चा आहे. तांबे पिता-पुत्र काँग्रेसमधून निलंबित असल्याने काँग्रेसच्या चिन्हावर प्रचार करणे त्यांना जमणार नाही आणि त्यामुळेच शहर विकास आघाडी करून नवीन चिन्ह घेत काँग्रेस पक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी देखील सावध प्रतिक्रिया देत निवडणुकीबाबत स्वतंत्र टीमची स्थापना करण्यात आली असून, सर्वांना सामावून घेत लवकरच पुढे कसे जायचे? याबाबत निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट केलं. तर शहर विकास आघाडीबाबत देखील बोलताना ज्यांच्यावर जबाबदारी दिलीय ती टीम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









