आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भंडारा जिल्हा हा धानपिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गत ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतीवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली, नर्सरी व रोवणी नष्ट झाली. केलेली शेती पुन्हा तयार करून शेतकऱ्यांना उशिरा म्हणजेच दुपार पेरणी व रोवणी करावी लागली. यामुळे उत्पादनात मोठी घट आणि खर्चात प्रचंड वाढ झाली असून शेतकरी आर्थिक संकटातसापडले आहेत. शेतकऱ्यांनी दुबार नर्सरी, रोवणी, खते, औषधी, निंदन आदीसाठी फार मोठा खर्च केला आहे.
दरम्यान, आता भातपीक कापणीच्या अवस्थेत आले असताना दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ पासून अवकाळी पावसामुळे संपूर्ण धानपिक पुन्हा एकदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. केवळ धानच नव्हे तर सोयाबीन, कापूस, भाजीपाला आदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे घास गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच गावातील रस्ते, शाळा, अंगणवाडी केंद्रे, शासकीय इमारती व जलसाठेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागात वाहतुकीची साधने विस्कळीत झाली असून लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना मार्फत मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचेमार्फत श्री नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात भंडारा जिल्हा “ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ?१ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामेकरून मदतीचे वितरण करण्यात यावे, शासकीय व सार्वजनिक इमारतींच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी देण्यात यावा, अशीही मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे करण्यात आली आहे. यावेळी आनानाभाऊ पटोले, खासदार डॉ प्रशांत पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिस अहमद, जिल्हाध्यक्ष मोहन पंचाभाई, प्रदेश सचिव जिया पटेल, जि. प. अध्यक्ष कविता उईके, जि. प. सभापती शितल राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री बोरकर, जय डोंगरे, अमर रगडे, प्रेम वनवे, प्यारेलाल वाघमारे, मनीषा निंबार्ते, अभिजीत वंजारी, रिजवान काजी , दिलीप मासुरकर , धनराज साठवणे , शंकर राऊत, सुरेश मेश्राम, विजय शहारे, कान्हा बावनकर, शंकर तेलमासरे , धर्मेंद्र नंधरधने , हेमंत बडवाइक, पवन वंजारी, विनीत देशपांडे, इमराण पटेल, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









