आमदार राजू कारेमोरे यांचा प्रशासनाला कडक इशारा, हक्कभंगापासून चौकशीपर्यंत ठाम भूमिका — “जनतेचा विश्वास अबाधित ठेवणार”

( आष्टी येथिल प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीच संबंध नाही )
तुमसर :- तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि शासकीय यंत्रणेला सजग राहण्याचा कडक इशारा दिला. स्थानिक प्रश्नांवर निर्भिडपणे बोलताना त्यांनी गोबरवाही पोलिस ठाणे, तुमसर नगरपालिका प्रशासन आणि भंडारा–बालाघाट राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांवर तीव्र टीका केली.
गोबरवाही ठाणेदारांच्या “मनमानी” आणि “अयोग्य वर्तणुकी”बद्दल कारेमोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभेच्या सदस्य या नात्याने हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जनतेत असंतोष निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
तुमसर नगरपालिकेतील पारदर्शकतेचा अभाव, मनमानी निर्णयप्रक्रिया आणि विकासकामांतील विलंब यावरही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. भंडारा–बालाघाट राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील निविदा प्रक्रिया व कंत्राटदारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत बोलताना आमदार कारेमोरे म्हणाले, “पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. राज्य सरकारने अधिवेशनाची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी.”
आष्टी येथे घडलेल्या बंदुकीच्या धाकाद्वारे धमकी प्रकरणीही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “त्या घटनेतील आरोपींचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कुठलाही संबंध नाही, आणि कुणीही पक्षाच्या नावावर गैरकृत्य करत असेल, तर त्याला पाठिंबा देऊ नये,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पत्रकार परिषदेतून आमदार कारेमोरे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, जनतेच्या प्रश्नांवर ते कधीही मागे हटणारे नाहीत. प्रशासन जबाबदार राहिलेच पाहिजे, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा इशाराच त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर-मोहाडी विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे , शहर अध्यक्ष योगेश सिंगणजूडे, अल्पसंख्याक सेलचे यासीन छवारे, हितेश चोपकर उपस्थित होते.









