राजकारणाच्या चे मुख्याधिकारी चौहान दबावतंत्रात भंडारा न. प. बळी पडणार का?

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन)ः- अधिकारी कितीही कार्यक्षम असो राजकीय नेत्यांमुळे त्याचा टिकाव किती दिवस राहील, हे निश्चित सांगता येत नाही. असाच प्रकार सध्या भंडारा व पवनी न. प. चे मुख्याधिकारी यांच्या बाबतीत दिसून येत आहे. भाजप व शिवसेना यांच्या भांडणात त्यांचा बळी जाणार का? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे वारे सुरू होताच भंडारा जिल्ह्यात भाजप व शिवसेना यांच्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

भंडारा, तुमसर व पवनी नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. नंतर राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर तिन्ही नगर परिषदेत प्रशासकराज सुरू झाले. यामुळे या नगरपरिषदेतील कामे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या सांगण्यानुसारच झालेत. मात्र नगर परिषद निवडणूक पुढे पाहता भंडारा व पवनी येथे भाजप व शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी भंडारा नगर परिषदेचे अतिशय कार्यक्षम असलेले मुख्याधिकारी करणकुमार चौहान यांनी नियमबाह्यपणे विकास कामे मंजूर केली व नंतर रद्द केली अशी तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौहान यांना नोटीस पाठवून तीन दिवसांत उत्तर मागितले.

यातच चौहान यांची प्रकृती बिघडल्याने ते सुट्टीवर गेले आहेत. भंडारा नगर परिषदेत येण्यापूर्वी करणकुमार चौहान हे गोंदिया नगर परीषदेचे प्रशासक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अतिशय जवळचे समजल्या जातात. भंडारा येथे येताच त्यांनी भंडारा नगर परिषदेत शिस्त लावली. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व जनतेची कामे याकडे त्यांनी लक्ष दिले. अल्पावधीतच ते शहरात व नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांत आवडते ठरले.

नगर परिषदेत अडचणी असल्यास सरळ त्यांच्या कक्षात येण्यासाठी त्यांनी आपले दालन सुरू केले. त्यांच्या कार्यकाळात सत्तापक्ष तसेच विरोधकांचेही कामे झालीत. मात्र नगर परिषद निवडणुकीचे वारे सुरू होताच सत्ताधारी पक्षातील मुख्य पक्ष भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली. यासाठी पक्षात बंडखोरी सुरू झाली. याच बंडखोरीचा फटका नगर परिषदेच्या कामावर बसत आहेत.

भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेत्यांना शहरातील कामे मिळाली. मात्र नुकतेच आ. परिणय फुके यांनी नगर परिषदेतील कामे टक्केवारीवर नियमबाह्यपणे वाटण्यात आल्याचा आरोप केला. हा आरोप करतांना नगर परिषदेत पाच वर्षे त्यांच्याच पक्षाची सत्ता होती, हे सुध्दा ते विसरले. कामे त्यांच्याही पक्षातील लोकांनी केले, हे सुध्दा त्यांना कळले नाही, याचेच आश्चर्य वाटत आहे. नगर परिषद निवडणुकीच्या या रणसंग्रामात भाजप व शिवसेनेतील वादात नगर परिषदेचे कार्यक्षम मुख्याधिकारी करणकुमार चौहान बळी पडणार का? अशी चर्चा सध्या भंडारा शहरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *