दुषित पाण्यामुळे कान्हळगाव (मुंढरी) येथे विषबाधा, अनेकांवर उपचार सुरू

* संडास व उलटीचा त्रास जाणवताच करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी
*गावातच लावला आरोग्य तपासणी शिबिर
काशिनाथ ढोमणे
भंडारा :- मोहाडी तालुक्यातील ९०० लोकसंख्या असलेल्या कान्हळगाव (मुंढरी) येथे ३० आक्टोबरच्या रात्री ग्रामस्थाना व मंडई निमित्त आलेल्या पाहुण्यांना अचानक संडास व उलटीचा त्रास सुरू झाला. काहींनी प्राथमिक आरोग्य केंद्र करडी गाठले तर काही खासगी दवाखान्यात जाऊ लागल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. याचे नेमके कारण पुढे आले नसले तरी दुषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची चर्चा सुरू आहे.
कान्हळगाव येथे २९ ऑक्टोबर रोजी मंडई होती. यानिमित्त गावात बाहेरील पाहुणे आले होते. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी घरोघरी पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आला. रात्री पाहुण्यांसोबत जेवण करून उशिरापर्यंत गप्पागोष्टी केल्या. अचानक रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान अनेकांना संडास व उलटीचा त्रास जाणवू लागला. संपूर्ण गावातच त्रास होऊ लागल्याने काहींना खाजगी दवाखान्यात घेवून गेले तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे भरती करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. पांडे मॅडम दुपारपर्यंत रुग्णांवर उपचार करीत होते. कान्हळगाव येथे आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे.
संगीता भोयर (वय ४४), मिनाक्षी ठवकर बोद्री (२५), सुनंदा भोयर (५०), धृरपता शेंडे (६०), सरपंच लोकेश रोटके (३०), प्रमेश्वर रोटके (५५), समृध्दी भोयर (१४), कमलेश ठवकर (३३), वेदान्त पंचबुधे (१५), अनंदा भोयर (६५), सीमा खवास परसवाडा (३२), नितीन मिरासे खुर्चिपार (३०), शुभांगी मंडये (३५), मोनु ठवकर (१२), शरद भोयर (१९), वंश भोयर (२०), रोशन गाढवे मांडवी (२५), वेदान्त मेश्राम मांडवी (१२), रीनाली कानतोडे पिंपळगाव (५२),सविता सिंगणजुडे परतवाडा (४२),संजय मिराशे खुर्चिपार (५३), रवि मोहतुरे (२१) विहीरगाव, संगीता भोयर (४०),मयुरी रोटके (१६), प्रिती गाढवे (२६), प्रगती कातोरे (५), गुलाब सेलोकर (५०), मंथन भोयर (२५), सचिन सेलोकर (३४) यांचेवर उपचार करण्यात आले.
कान्हळगाव येथील पाणी पुरवठा टाकी अनेक दिवसांपासून साफ केली नसल्याने पाण्यातून विषबाधा झाल्याची चर्चा गावात सुरू आहे.

“ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणामुळे कान्हळगाव ग्रामस्थांना दुषीत पाणी मिळत असल्याने ही विषबाधा झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पाण्याची टाकी साफ करून ब्लिचिंग पावडर घालावा व काही लिकेज आहेत ते दुरुस्त करावे. जेणेकरून ग्रामस्थांना दुषीत पाणी पिण्याची वेळ येणार नाही.”
– दिगांबर कुकडे,
माजी सरपंच, कान्हळगाव
कान्हळगाव येथे आरोग्य विभागाच्या टिम कडून चौकशी केली असता टाकीच्या पाण्याची तपासणी दोन दिवसा अगोदर केली असून टाकी साफ आहे व नेहमी बिंचिग पावडर घालण्यात येते .एक दिवसा अगोदर पाउस आल्याने नाली जवळील असलेल्या वाल मध्ये दुषीत पाणी गेल्याने हा प्रकार घडू शकतो. कारण की पाईप वाल लागुण नाली आहे व नालीत दुषीत पाणी आहे त्यामुळे संडास उल्टीचा प्रकार जाणवला असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले.
यावेळी आरोग सभापती आनंद मल्लेवार, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर,पं सं सदस्य आशा बोंद्रे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ चिराग सोनकुसरे, आरोग्य अधिकारी डॉ अनिल बिसेन , सरपंच लोकेश रोटके, उपसरपंच दादाराम भोयर व ग्रामस्थ उपस्थित होते.
तात्काळ वाल असलेल्या ठीकाणी भोवताल सिर्मेट काँक्रीटचे टाकी बनवायला सांगितले जेणेकरून ग्रामस्थांना दुषीत पाणी जाणार नाही याची जबाबदारी ग्रामपंचायत ला घ्यायची आहे असे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ श्रीकांत आंबेकर यांनी सरपंच लोकेश रोटके यांना सांगितले.







