लिखित आश्वासनानंतर संगणक परिचालकांचे “जल व अन्न त्याग’ आंदोलन मार्ग

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधन देण्यात यावे, जून २०२५ पासून थकित असलेले मानधन देण्यात यावे तसेच कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर १३ ऑक्टोंबरपासून सुरु असलेले संगणक परिचालकांचे “जल व अन्न त्याग’ आंदोलन आज उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रामपंचायत) उमेश नंदागवळी यांच्या लिखित आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

आज तिसऱ्या दिवशी संघटनेचे अध्यक्ष सचिन खंगार यांची प्रकृती बिघडली. अन् आंदोलकांचा संयम सुटला. लगेच सर्व आंदोलक राष्ट्रीय महामार्गावर उतरले. सचिन खंगार यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. दुसरीकडे महामार्गरोखल्याने दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होता. खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद सभापती ननेश ईश्वरकर, शितल राऊत, कविता उईके आंदोलन स्थळी उपस्थित होते. उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्रामपंचायत) उमेश नंदागवळी आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन बंद केले. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक दिगंबर वंजारी व इतर पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उमेश नंदागवळी यांचेची चर्चा केली.

नंदागवळी यांनी आंदोलकांना त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी वरीष्ठ स्तरावर कळवितो, आपण आंदोलन मागे घ्यावे, असे सांगितले. मात्र आंदोलक मागण्यांच्या पूर्ततेवर ठाम राहिले. अखेर उमेश नंदागवळी यांनी आंदोलकांना लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यास तयार झाले. खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हा परिषद सभापती नेश ईश्वरकर, शितल राऊत, कविता उईके, उमेश नंदागवळी यांनी लिंबू पाणी पाजून आंदोलन सोडविले. काही संगणक परिचालकांची तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधनाची एक मागणी पूर्ण झाली असली तरी अजून राज्यातील सर्वच संगणक परिचालकांचे माहे जून २०२५ पासून ते सप्टेंबर २०२५ या चार महिन्यांचे मानधन अजूनही थकीत आहेत.यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *