संघामुळेच आज देशात स्थिरता
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी काम केले, ते आजवर चालूच आहे. संघामुळेच देशात स्थिरता आहे. संघाने कधीच जाती, धर्म आणि प्रांत यामध्ये भेदभाव केला नाही. केवळ राष्ट्र प्रथम हेच ध्येय घेऊन संघाचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ता व राष्ट्रीय स्वयंसेवक पवनी खंड सहकार्यवाह विवेक जुमळे यांनी केले. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सव रविवारी १२ ऑक्टोंबर रोजी पार पडला,त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजामध्ये चांगल्या लोकांची गरज असल्याचे सांगून १९२५ साली संघाची स्थापना झाली.
या छोट्या रोपट्याचे आज वट वृक्षात रूपांतर झाले. ही एक छोटी सुरुवात होती. पण, आज संघाच्या देशभरात एक लाखांहून अधिक शाखा कार्यरत आहेत. संघाचे कोट्यवधी स्वयंसेवक देशभरात सक्रिय आहेत. केवळ भारतातच नव्हे तर विदेशांमध्येही संघाच्या शाखा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षीच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमसर खंडच्या वतीने विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव सिहोरा येथील बाजार चौकाच्या पटांगणावर साजरा करण्यात आला. यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी व्यायाम आणि योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीसेवानिवृत्त प्राचार्य भालेराव तुरकर हे होते. तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुमसर तालुका प्रचारक ऋषभ चिंचोडकर, तुमसर तालुका सहकार्यवाह विक्रांत मिश्रा, सिहोरा मंडल कार्यवाह गजानन निनावे, मोतीलाल ठवकर, सुभाष बोरकर, पंकज शुक्ला, बाला तूरकर, कालिदास कुंभारे, भारत चौधरी, पपिकांत मोरे, पप्पू पारधी, विकास बिसने, सतीश पटले, राजू मेडेवार, गरीबदास निनावे, शंकर टेंभरे, गोवर्धन शेंडे, मुकेश शुक्ला, गुलशन पात्रे आदि स्वयंसेवकांनी सहकार्य केले. संघ प्रार्थनेनंतर विजयादशमी उत्सवाचा समारोप झाला.









