भंडाऱ्यात दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफसीएलसी वार्षिक सभा व लोककल्याण मेळावा उत्साहात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषदेतर्फे दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफ – सीएलसी वार्षिक सर्वसाधारण सभा व लोककल्याण मेळावा लक्ष्मी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात ९०० हून अधिक महिलांचा सक्रिय सहभाग झाला. या प्रसंगी बचत गटांना एकूण १९ लाख रुपयांचा अर्थसहाय्य निधी तर प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत निवड झालेल्या १३ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते झाले. यावेळी अति. जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फडके, जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ, अग्रणी प्रबंधक राजु नंदनवार, बँक ऑफ इंडियाप्रबंधक राम राजेंद्र मनी, अभियान व्यवस्थापक प्रविण पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात पोलिस अधीक्षक हसन म्हणाले, बचत गट ही महिला सक्षमीकरणाची महत्त्वाची कडी असून, यामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. महिलांचा नियोजनबद्ध दृष्टीकोन कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचा ठरत आहे. भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, शहरातील ८५० बचत गटांच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील महिला व्यवसाय व स्वयंरोजगारात उतरत असून, त्यांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण १०० टक्के आहे. अति. जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे नमूद केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी फडके यांनी उत्पादित वस्तूंच्या गुणवत्तेकडे व पॅकेजिंगकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. जिल्हा माहिती अधिकारी वाघ यांनी स्वानंदी शहर स्तर संघाच्या कार्याचे कौतुक केले.अभियान व्यवस्थापक पडोळे यांनी २०३० पर्यंत पीएम स्वनिधी योजना सुरू राहणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात स्वरा, यमुना, श्री साई व पुण्याई बचत गटांना मिळून १९ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. तसेच पीएम स्वनिधी योजनेंतर्गत एकूण ६५ लाभार्थ्यांना २१ लाख रुपयांचा निधी वाटप झाला. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर शहरातील विविध समुदाय संघटकांनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. या मेळाव्याद्वारे महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *