जिल्हा बँक देणार सभासद संस्थांना ५ टक्के लाभांश, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांची आमसभेत घोषणा

*गटसचिव निवडीचे अधिकार आता बँक व देखरेख संस्थेकडे
भंडारा :- जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थीत ठेवण्यात सभासद संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे. त्याचा परिणाम जिल्हा बँक २००७-०६ पासुन सतत निव्वळ नफ्यात राहीली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन जिल्हा बँक सभासद संस्थांना लाभांस देऊ शकली नाही. चालु आर्थिक वर्षात बँकेला ४७४.७७ लक्ष रुपयाचा नफा आला आहे. त्यामुळे यंदा ५ टक्के लाभांस देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुडे यांनी केली. ते आज लक्ष्मी सभागृहात आयोजीत जिल्हा बँकेच्या २२ व्या आमसभेत बोलत होते.
या आमसभेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी बँकेने केलेले काम व पुढील वाटचालीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले, भंडारा जिल्हा बँकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असून जिल्हा बँकेने ही कामगिरी सलग १२ वेळा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, शसकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळे यांचे बँकींग व्यवहार हाताळण्यासाठी राज्यातील १२ जिल्हा बँकांची निवड झाली. त्यात ‘भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’ चा समावेश आहे. ही बाब बँकेसाठी गौरवास्पद आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र क्रियान्वीत करण्यात आले आहे. २३ शाखमध्ये ए.टी.एम. सुविधा उपलब्ध आहे. सर्वच शाखांना स्वतंत्र आयएफएससी कोड प्राप्त आला आहे. भंडारा जिल्हा दुग्धोत्पादनात सतत अग्रेसर राहणेसाठी गाय, जशी गाय, म्हैस, मेळी, मेंढीपालन याकरीता कर्जपुरवठा सुरु केला आहे. सुक्ष्म, लघुउद्योग वाढीसाठी व्यवसायिक तथा वैयक्तिक वाहन खरेदीसाठी, हार्वेस्टर आणि सोलर खरेदीसाठी, गोदाम बांधणे, दुरुस्ती करणे बासाठी कर्जवाटप करणे सुरु केले आहे.

ते पुढे म्हणाले, बँकेचे मुख्य कार्यालय व ८ शाखा बँकेच्या स्वः मालकीच्या ईमारतीत आहेत. बँकेच्या १५ शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध आहेत. २०२४-२७ च्या खरीप पिक कर्जाच्या रु. ४८४.५८ कोटी उहिष्टांपैकी दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत बँकेने ७८९१८ सभासदांना रु. ४५३.०० कोटीचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदाने उपलब्ध करून दिले आहे. त्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. हा कर्ज पुरवठा बँकेने स्वनिधीतून केला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ३४७०७ शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला असून एकूण रु. १६९.८१ लक्ष प्रिमीयम प्राप्त झाले. सदर रक्कम भारतीय कृषि विमा कंपनी कडे वर्ग करण्यात आली असून यापैकी बँकेत रक्कम शिल्लक नाही. या वसुली हंगामात दि. ३० जुन २०२० अखेर बैंक स्तरावर सेती कर्जाची वसुली ५६.६८ टक्के झाली आहे. राज्य शासन व नाबार्ड येथील वरिष्ठांनी नेहमीच बँकेचे कौतुक करून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे व करीत आहेत.
१३० सेवा सहकारी संस्था संगणीकृत करण्यात आल्या आहेत. भंडारा व पवनी विधानसभा क्षेत्रात सहकारी संस्थांचे इमारत बांधण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इतरही आमदारानी यासाठी सहकार्य करावे. सेवा सहकारी संस्थाचे गटसचिव नियुक्तीचे अधिकारी आता बँक व जिल्हा देखरेख संस्थेकडे आले आहेत, अशीही माहिती सुनिल फुंडे यांनी दिली.
बँकेची आर्थिक स्थिती व ग्राहक सेवा सुरळीत राहणेसाठी कर्जपुरवठा तसेच कर्जवसुली, बैंक शाखांची नियमीत तपासणी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत. यासाठी सर्व सभासद व ठेवीदार, कर्जदार, बँकेचे माझे सर्व सहकारी संचालक, जेष्ठ सहकारी बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवा सहकारी संस्था तसेच इतर सर्व संस्थांचे संचालक मंडळ, सर्व संस्थांचे गटसचिव बँकेचे हितचिंतक या सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. ते सतत मिळत राहावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा बँक तुमची आमची सर्वांची आहे. तिचा विकास करणे, बँकेला यशाच्या शिखरावर नेणे ही आपली सर्वांची संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगीतले.
या आमसभेला बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप-पडोळे, सर्व संचालक, जिल्हा दूग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, अर्बन बँकेचे अध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, माजी आमदार चरण वाघमारे, अभिजित बंजारी, दामाजी खंडाईत, अर्बन बँकेचे संचालक, दुग्ध संघाचे संचालक, जिल्ह्यातील सभासद संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*सभासद संस्थांना क्रियाशील करा – चरण वाघमारे*
ग्रामीण भागात विकास ख-या अर्थाने सहकार विभागावर अवलंबून आहे. बँकेतील काही सभासद संस्था क्रियाशील आहेत तर काही संस्था फक्त निवडणुकी पुरतेच क्रियाशील होताच. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बँकेने त्यांच्या सर्व सभासद संस्थांना क्रियाशील करून गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन माजी आमदार चरण वाघमारे यांनी यावेळी केले.







