आधी आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे, आता…; पुण्यात अजित पवारांना शरद पवारांची आठवण

पुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय आखणी करत आहेत. त्याच अनुषंगाने २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी राजकीय भूमिका मांडली. यावेळी, नाव न घेता त्यांची आपल्या चुकांवर पांघरुन घालायला आधी साहेब होते, आता आपल्यालाच पांघरुन घालायचे आहे, असे म्हणत शरद पवारांची आठवण काढली. तसेच, कार्यकर्त्यांना सबुरीने वागण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिला.

ज्याच्यामध्ये इलेक्टीव मेरिट असेल त्याला आपण तिकीट देऊ, शंकर मांडेकरला पक्ष सोडायचा नव्हता तो आपल जुना कार्यकर्ता आहे. पण त्याला दुसरीकडे जावं लागलं. तर, शिरूरमध्ये माझी भावकी मला सोडून गेली. अशोक पवार पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होते, त्याला वाटत होतं की तुम्ही दादासोबत गेले, आपण इकडे राहून मंत्री आणि पालकमंत्री करू. मात्र, मी त्याला सांगितलं होतं की तू मला सोडून गेला आता तुला पडणार, आणि अशोक पवारला मी पाडलं, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. सुनील शेळके यांना देखील आपल्याच लोकांनी टार्गेट केलं पण तो देखील बाबा निवडून आला. सगळ्यांना विनंती आहे, ज्याच्यासोबत राहायचं त्यांच्यासोबत निष्ठेने राहा. दोन-तीन ठिकाणी राहू नका, हातात काहीच राहणार नाही, निष्ठेला आणि ध्येयाला महत्त्व द्या, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *