पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा लेखनी बंद आंदोलनाचा दुसरा दिवस

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली पंचायत समितीमध्ये सभापती ललित हेमने यांनी पंचायत समिती येथील कर्मचारी व अधिकारी वर्गाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंदच्या खंजर उपसला असून या लेखणी बंद आंदोलनामुळे तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांचे कार्य कोळंबले आहे. पंचायत समिती साकोलीत सभापती ललित हेमणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष दुसऱ्या दिवशी अधिक चिघळला आहे.

१९ सप्टेंबरच्या मासिक सभेत सभापतींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप होताच, २२ सप्टेंबरपासून सर्व अधिकारीकर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलनछेडले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले असून प्रमाणपत्रे, योजनांचे प्रस्ताव आणि शासकीय मदतीसाठी आलेल्या नागरिकांची कामे रखडली आहेत. दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याने जनतेत नाराजीचा सूर असला तरी कर्मचाऱ्यांनी हा आपला संवैधानिक अधिकार असल्याची जाणीव यावेळेस सर्वसामान्यांना करून दिली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे निवेदन सादर करून सभापतींनी सार्वजनिक माफी मागावी, अशी ठाम मागणी केली आहे. माफी मागेपर्यंत लेखनीबंद आंदोलन सुरू राहील. अशोभनीय वर्तनाला प्रशासनिक यंत्रणा सहन करणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

गटविकास अधिकारी पुंडलिक जाधव यांनी सभापतींच्या वागणुकीमुळे सर्वच कर्मचारी, विशेषत: महिला कर्मचारी दुखावले गेल्याचे सांगत रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, सभापती ललित हेमणे यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्या विरोधात कट रचून खोटे आरोप केले जात असल्याचा पलटवार केला आहे. मी कधीही अशोभनीय शब्द वापरले नाहीत. उलट अधिकारीच जनतेच्या कामासाठी पैसे मागतात. जनता आमच्याकडे तक्रारी घेऊन येते, त्यांच्या हक्काच्या कामासाठी मी लढत राहणार, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. या संघर्षामुळे पंचायत समितीचे वातावरण तणावपूर्ण झाले असून प्रशासन व जनप्रतिनिधी यांच्यातील टोकाचे मतभेद उघड झाले आहेत.दैनंदिन कामे व विकासकामे ठप्प झाल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

आमच्या कामांचा बळी अंतर्गत वादाला जाऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली असून वरिष्ठ प्रशासकीय व राजकीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा वाद लवकरात लवकर संपुष्टात यावा अशी तालुक्यातील नागरिकांनी मागणी केली आहे. दिनांक २६ सप्टेंबर रोजी शेंदूरवाफा येथील मंगलमूर्ती सभागृहात पंचायत समितीची वार्षिक सभा आयोजित केली असून या सभेत वर्षभराचा आराखडा केलेली कामे या सर्वा ंत कामाचा आढावा या आमसभेनिमित्त घेतला जातो परंतु प्रशासन व प्रजातंत्र आमने-सामने आले असल्यामुळे आम सभा होणार की नाही याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकात चर्चा असून सध्या प्रजातंत्र व प्रशासनाचा हा वाद विकोपाला गेला असल्यामुळे काही दिवस तरी शेतकरी व सामान्य जनतेचे पंचायत समिती येथील वेगवेगळे व विभिन्न कामात खोळंबा आला असून जनतेच्या कामावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *