राष्ट्र संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे- लक्ष्मणराव गमे
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीच्या सौजन्याने मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय जांभळी येथे भंडारा जिल्हास्तरीय प्रचार कार्यकर्ता मेळावा दिनांक १४ सप्टेंबर २०२५ ला संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ लक्ष्मणराव गमे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसर्वाधिकारी गुरुदेव सेवा मंडळ दामोदर पाटील हे होते तर स्वागताध्यक्ष पंचायत समिती सदस्य तथा संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा होमराज कापगते, प्रमुख वक्ते प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, अशोक चरडे, राम राऊत, प्रमुख अतिथी विठ्ठलराव सावरकर, बाबाराव पाटील, देवराव भांडारकर, नीलकंठ कळंबे, अहिल्याबाई गोखले, डॉ. वसंतराव बाळबुद्धे हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुशील बुरडे यांनी केले प्रास्ताविक मनोगतातून त्यांनी सांगितले की गावाचा विकास झाला तर देशाच्या विकास होईल असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या साहित्यातून विचार व्यक्त केले त्या विचारांची आज समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होमराज कापगते मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे परंतु राष्ट्रसंतांच्या भजनावलीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचे सामर्थ्य तुकडोजी महाराजांच्या साहित्यात आहे. राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण त्यांनी दिली. अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला अत्यंत मोलाचे कार्य राष्ट्रसंतांनी केलेले आहे. कार्यक्रमाचे संचालन हेमलता मांडवटकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार मोहन चोपकर जिल्हा प्रचार प्रमुख व शालू कापसे महिला प्रचार प्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रवंदना व जयघोष द्वारे करण्यात आला.









