पालांदूर येथे तलावात बुडून इसमाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा
पालांदूर:येथील गावतलावात एका व्यक्तीचा तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनीवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील पालांदूर या गावात उघडकीस आली.
कृष्णा रामा नंदनवार (५४)रा.पालांदूर असे मृतकाचे नाव आहे.तो सकाळी त्याच्या घरातलगत असलेल्या तलावाकडे सहज फिरायला गेला होता.तलावाच्या पाळीवरून चालताना त्याचा तोल गेल्याने तो खोल पाण्यात पडला.त्यास पोहता येत नसल्याने व गाळात त्याचे पाय फसल्याने त्याला बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली,मात्र मदत मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.पालांदूर पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरीता शवविच्छेदन गृह लाखनी येथे आणला व शवविच्छेदन आटोपल्यावर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.सदर घटनेचा पालांदूर पोलिसांनी मर्ग क्र.२१/२५ कलम १९४ नुसार दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार सतिश बंसोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय हेमने करीत आहेत.







