शिवभोजन केंद्रांचा मागील पाच महिन्यांपासून अनुदान रखडला
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- गरिबाच्या ताटात अन्न पोहोचवणारी “शिवभोजन थाळी’ योजना सध्या स्वतः उपासमारीच्या उंबरठ्यावर उभी आहे. मागील पाच महिन्यांपासून रखडलेल्या शासकीय अनुदानामुळे तुमसर तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्रांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेकडो गरजूंना मिळणारे स्वस्त जेवण आता धोक्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने २०२० पासून सुरूकेलेली ही योजना, सुरुवातीला गरीब, रस्त्यावरच्या मजूर वर्गाला आणि असंघटित कामगारांना आधार देणारी ठरली होती. सध्या तुमसर शहरात असलेल्या बारा शिवभोजन केंद्रांमार्फत दररोज बाराशे थाळ्यांचे वितरण केले जाते. मात्र, एप्रिल महिन्यापासून कोणतेही अनुदान न मिळाल्याने, अन्न साहित्याचा पुरवठा अडखळला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत.







