आरोग्य मंत्र्यांसह झालेल्या बैठकीनंतर एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप मागे

गोंदिया : – राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर बुधवारी १० सप्टेंबर रोजी संप अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार याविषयी सकारात्मक असल्याचे सांगत नामदार आबिटकर यांनी संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली.तसे लेखी पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. १४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी १९ ऑगस्टपासून एनएचएमच्या राज्यभरातील सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होते. विविध मागण्यांसाठी आरोग्य सेवेतील १६ संघटनांनी प्रथमच एकत्र येऊन यात सहभाग घेतला होता. आरोग्यमंत्री आबिटकर यांनी बुधवारी १० सप्टेंबर रोजी एकत्रीकरण संघटनेशी सविस्तर चर्चा करून यावर तोडगा काढला.

यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक विजय गायकवाड, दिलीप उटाणे, ॲड.भाग्यश्री रंगारी,डॉ.दत्ता गायकवाड, डॉ. राम नागे, हर्षल रणवरे, डॉ. प्रकाश मोरे, स्वप्नील गोसावी. श्रीधर पंडित, गौरव जोशी, बबलू पठाण यांच्यासह इतर राज्य समन्वयक उपस्थित होते. आयुक्त कादंबरी बलकवडे आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक नितीन अंबाडेकर यांच्यातही याविषयी सकारात्मक बैठक झाली. समायोजनाबाबत पहिल्या टप्प्यात १० वर्षाहून अधिक सेवा पूर्ण झालेल्या १३ हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून भविष्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल. काही मागण्या टप्प्याटप्प्याने मार्गी लागतील, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गोंदियात अध्यक्ष अर्चना वानखेडे, उपाध्यक्ष पवन फुंडे, समन्वयक राजू येळे, उकदास बिसेन, संजय दोनोडे, अविनाश वन्हाडे, डॉ. मीना वट्टी, बबिता रहांगडाले,मनोज तिवारी, संकेत मोरघरे, संतोष बोरकर, अनिल रहमतकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *