जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात आज धरणे आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आवाहनानुसार इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने व संविधान प्रेमी पक्ष व संघटनांनी १० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता कलेक्टर कचेरी समोरील धरणे आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी केले आहे. दि. ८ सप्टेंबर ०२५ ला भाकपच्या भंडारा तालुका कौन्सिल ची विस्तारित सभा जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. भगवान मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. हिवराज उके बोलत होते.
या सभेत पक्षाच्या जिल्हा कौन्सिल सभेच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यात १० सप्टेंबर च्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन, १४ सप्टेंबर च्या नाशिक येथील दलित अधिकार आंदोलन मेळाव्यात सहभाग, १ ते १५ सप्टेंबर पर्यंत युगांतर, मुक्ती संघर्ष, न्यू एज या पक्षाच्या मुखपत्राची वर्गणीदारांची जाहीर नोंदणी, पक्षनिधी, नगरपरिषद निवडणुकीत सहभाग, महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अजित दादाच्या दादागिरीचा निषेध इत्यादी निर्णय घेतल्याचे कॉ. हिवराज उके यांनी जाहीर केले. संचालन पक्षाचे तालुका सचिव कॉ. गजानन पाचे यांनी केले तर आभार जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. ताराचंद देशमुख यांनी मानले. या सभेत प्रामुख्याने कॉ. प्रियकला मेश्राम, वामनराव चांदेवार, माणिकराव कुकडकर, वाल्मीक नागपुरे, मंगेश माटे, हरिदास जांगडे, राजू लांजेवार, गौतम भोयर, नीलकंठ कावळे, उषा शुर्यवंशी, लिलाबाई तुळसकर, गणेश क्षीरसागर, गोपाल चोपकर, रामराव रामटेके इत्यादी तालुका कौन्सिल सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.







