श्री गणेश सजावटीतून साकारला मराठी शाळा वाचविण्याचा देखावा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सालाबादाप्रमाणे बाप्पाचं आगमन झाले. बाप्पाच्या आमगनानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळामार्फत उत्कृष्ट सजावट करून वेगवेगळा देखावा साकारण्यात येतो. परंतु, भंडारा शहरातील खात रोडवरील शिवनगरीत राहत असलेले निखिल संजय कुंभलकर यांनी घरगुती श्री गणेश सजावटीतून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा वाचविण्याचा देखावा साकारलेला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण द्यावे अशीच अपेक्षा बाळगतो. पण या इंग्रजी शिक्षणाच्या मागे धावताना आपण आपल्या मातृभाषेतील शिक्षण विसरतो आहोत. मराठी ही आपली मायबोली आहे. या मातृभाषेतून शिक्षण घेतल्याशिवाय विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. मराठी शाळांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद पडत आहेत. हे चित्र आपल्या संस्कृतीस व इतिहासास घातक आहे.
मराठी शाळा म्हणजे केवळ शिक्षणाची जागा नाही तर मराठी संस्कृती, परंपरा, विचार आणि जीवनमूल्ये जोपासण्याचे केंद्र आहे. शाळा वाचवायच्या असतील तर पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घालणे गरजेचे आहे. शासनाने मराठी शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक करावे. समाजातील प्रत्येकाने “मराठी शाळा वाचवा” हा संकल्प करून प्रयत्न केल्यास हळूहळू मराठी शाळांना पुन्हा सुवर्णकाळ प्राप्त होऊ शकतो. मराठी शाळा वाचवणे म्हणजे आपल्या संस्कृतीचे, ओळखीचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे होय. म्हणून चला, आपण सर्वांनी मिळून एकच निर्धार करूया “माझी शाळा, माझी भाषा, माझा अभिमान!’ असेही निखिल कुंभलकर म्हणाले. त्यांनी पेपर, कलर कागद, लोखंडी रॉड, क्राफ्ट पेपर, गोंद, लाईट, वॉटर कलर, टिनटेड पेपर, लाकडी भुसा, लाकडी प्लाय शीट, लाकूड, दोरा, लाईट्स इत्यादी साहित्यचा वापर करून संपूर्ण सजावट पर्यावरण पूरक करण्याचा केलेली असून “मराठी शाळा वाचवा” हा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.









