गणपती दर्शनासाठी आलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला; अपघातात पती जागीच ठार, पत्नी जखमी; कुटुंबाचा मन हेलावणारा टाहो
भंडारा :- गणपती दर्शनासाठी भंडाऱ्यात आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील साईमंदिरसमोर घडली.जगदीश गजानन चकोले (३६) रा. मोहाडी ता. मौदा जि. नागपूर असे मृताचे नाव आहे.
भंडारा येथील गणेशपुरच्या राजाचे दर्शन करण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील मौदा जवळील मोहाडी येथील जगदीश गजानन चकोले (वय ३६ वर्ष ), त्यांची पत्नी शुभांगी चकोले (वय २७ वर्ष), दोन मुले सार्थक (७ वर्ष) आणि अद्विक चकोले (वय ३ वर्ष) यांच्यासह काल मंगळवारी भंडारा येथे गणपती दर्शनासाठी आले होते. जगदीश चकोले हे हिडालको कंपनी मौदा येथे चालक या पदावर कार्यरत होते. जगदीशला काल सुट्टी असल्याने पत्नी व दोन्ही मुलासह भंडारा येथील गणपती पाहण्यास ते घरुन सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निघाले. लहान मुलगा चंद्रभान याची हिरो स्प्लेंडर क्र. एमएच ४० एयु ६१३६ भंडाऱ्याला आले. त्यांच्यासोबत गावातील योगेश माकडे हे सुद्धा त्यांच्या परिवारासह दुचाकीने आले होते.
मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास साई मंदिर मार्गावरुन राजीव गांधी चौकाकडे जात असताना ट्रक (क्र. सीजी ०७ बीपी ९६७७) च्या चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवून जगदीशच्या दुचाकीला मागेहून धडक दिली. या अपघातात जगदीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली.
यावेळी नागरिकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप दिला. तातडीने रुग्णवाहिकेने जगदीश आणि पत्नी आणि मुलाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, रुग्णालयात जगदीशला मृत घोषित करण्यात आले. भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी ट्रकचालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
रक्ताचा सडा, कुटुंबियांचा टाहो
अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा सांडला होता. पत्नी आणि मुलांचा टाहो मन हेलावणारा होता. अपघाताची माहिती जगदीशच्या वडिलांना मिळाल्यानंतर तेही गावावरुन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जगदीशचा मित्र योगेश हा पुढे गेल्याने त्याला अपघाताची माहिती मिळताच दुचाकी वळवून तोही पोहोचला. कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
वाहतूक व्यवस्थेचा बळी
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. गणपती दर्शनासाठी दूरवरुन भाविक भंडाऱ्यात दाखल होत आहेत. परंतु, पार्किंगअभावी दुचाकी, चारचाकी अस्ताव्यस्त लावले जातात. रस्त्यातून वाट काढणे धोक्याचे असते. त्यातच जड वाहतूक शहरातून होत असल्याने अपघाताची भीती असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेने जगदिशचा बळी घेतल्याचा आरोप होत आहे.







