घराची भिंत पडल्याने एक गाय व दोन शेळ्या जागीच ठार
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील निलागोंदी परिसरात पावसाने अनेक दिवसांपासून विश्राती घेतली असलेतरी (ता. २८ऑगस्ट) ला दुपारी १२.०० वाजता अचानक मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी घर पडले तसेच त्याच घराची भिंत श्री. टेकचंद सिताराम वंजारी वय ४२ रा. निलागोंदी ता.लाखनी जि. भंडारा यांच्या अंगणात व राहत्या घरावर पडल्याने अंदाजे १ लाख ४० हजाराचे नुकसान झाले आहे.ही घटना दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन लाखनी येथील पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ हे पोलीस स्टॉप सहित घटना स्थळी दाखल झाले तसेच साझा मोरगावचे तलाठी निशांत नेवारे,पशुधन अधिकारी डॉ. योगेश कापगते यांनी घटनेचा पंचनामा केला. सरपंच वर्षा वंजारी,उपसरपंच महेश हटवार,तमुश अध्यक्ष यशोराज हटवार, ग्रा.प.सदस्य छत्रपती हटवार यांनी जेसीबी बोलावून गावकऱ्यांच्या मदतीने मलमा काढण्यासाठी सहकार्य केले. अल्पभूधारक शेतकरी टेकचंद वंजारी यांनी शेताला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करीत होते.
अचानक मुसळधार पाऊस आल्याने टेकचंद वंजारी यांची पत्नी वैशाली टेकचंद वंजारी (वय ३५) ह्या शेतातील शेळ्या घरी घेऊन आले असता गौरीशंकर वंजारी यांचे अनिवासी घराची भिंत अंगणात व घरावर पडल्याने त्यात एक गाभण गाय, दोन गाभण शेळ्या व कोंबड्या जागीच ठार झाल्या तर एक महिला व एक गाय गंभीर जखमी झाली. जखमी वैशाली वंजारी ही महिला विठाच्या ढिगाऱ्याखाली दबली होती त्या महिलेला पावडा व हाताने ओडून काढण्यात आले.जखमी अवस्थेत महिलेला साकोली येथील खासगी रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले माहिती नुसार महिलेची प्रकुर्ती गंभीर आहे.यात टेकचंद वंजारी यांनाही जखम झाली आहे.या झालेल्या घटनेत अल्पभूधारक शेतकरी यांचे जर्सी गाय मृत्यू झाल्याने ६० हजारचे तर दोन शेळ्या मृत्यू झाल्याने ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले तसेच जर्सी जातीच्या गाभण गायीचे दोन पाय व पासऱ्या मोडल्याने ४५ हजाराचे असे एकूण १ लाख ४० हजाराचे नुकसान झाले असल्याने आपत्ती विभागाकडून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.







