जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता मुख्याध्यापक मेंढे यांची निवड
दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार करिता स्थानिक पीएमश्री जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सानगडी येथील मुख्याध्यापक डी. एच. मेंढे यांची निवड करण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातून २०२५-२६ च्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या प्रस्तावांमधून समितीमार्फत मूल्यांकन करून शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली.
यावेळी देवनाथ लांजेवार यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती देताना सांगितले की, समाजाला निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकाला त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांना पुरस्कृत आला. यावेळेस शालेय शिक्षक, शिक्षिका, घड्याळी तासिका शिक्षक, अंशकालीन निदेशक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.









