तुमसर येथे भर पावसाळ्यात बायपास रस्ता बांधकामाला सुरुवात
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर येथील विनोबा भावे बायपास रस्त्याच्या बांधकामाला पावसाळ्यातच सुरुवात झाली असून कामे गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. परंतु कामाचा वेग संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. येथे भर पावसाळ्यात सिमेंट रस्ता बांधकामाला परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ ५०० मीटर सिमेंट रस्ता बांधकामाला इतका वेळ लागण्यामागची कारणे कोणती, असाही सवाल उपस्थित होत आहे. या रस्त्यासाठी १ कोटी २६ लाखरुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषदेच्या नियंत्रणाखालील हा रस्ता असून, या कामाचे कंत्राट “बिलो’ मध्ये गेल्याची माहिती आहे.
वाहतूक वळिवली खापा मार्गावरून.. बांधकामामुळे गोंदिया मार्गावरील बस गाड्यांना खापा मार्गावरून वळिवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व इतर प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे. विनोबा भावे बायपास रस्ता हा सध्या कच्चा आहे. येथून वाहनांच्यावाहतुकीदरम्यान रस्त्यावरील धूळ उडत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहत असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. रस्त्याची कामे तत्काळ करून वाहतुकीची कोंडी व नागरी त्रासातून दिलासा देण्याची गरज आहे.









