ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोषात घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ढोलताशांच्या गजरात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करून प्रतिष्ठापन करण्यात आली. श्री गणेशाच्या आगमनाने शहरात तसेच ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या आगमनाने बाजारपेठ विविध प्रकारच्या सजावटींच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. श्री गणेशात्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण करण्यात आले. घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी करण्यात आली. सकाळपासूनच ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्याचे पाहावयास मिळाले. भंडारा जिल्हात एकूण सार्वजनिक गणपती ६७२ असुन त्यामध्ये ३१९ गावामध्ये एक गाव एक गणपती असणार आहेत.

भंडारा उपविभागात १८२ गणपतीची स्थापना होणार असुन त्यामध्ये ८० एक गाव एक गणपती, साकोली उपविभागा अंतर्गत १५१ गणपती त्यामध्ये ९२ एक गाव एक गणपती, तुमसर उपविभागामध्ये १५० गणपती ६९ एक गाव एक गणपती, पवनी उपविभागामध्ये १८९ गणपती त्यामध्ये ७८ एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पाहता अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. याकरिता भंडारा पोलीस दल सुध्दा सुसज्ज झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात १७ ही ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. नागरीकांनी शांतता व सुव्यवस्थेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *