कर भरणाऱ्या प्रमोदला मिळाली विमानाने प्रवास करण्याची संधी
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत खैरी/वालमाझरी ग्रामपंचायतीने “स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत’ या संकल्पने अंतर्गत करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत करदात्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. करदात्यांमधून ईश्वर लॉटरीच्या माध्यमातून सहा विजेत्यांची निवड करण्यात आली. पहिल्या लॉटरीत प्रमोद शंकर लांजेवार यांनी हैदराबादला विमान प्रवासाचे बक्षीस जिंकले. त्यामुळे प्रमोद लांजेवार यांचेसरपंच पुरुषोत्तम रुखमोडे ग्राम विकास अधिकारी नरेश शिवणकर तसेच ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. दुसऱ्या लॉटरीत विशाल रमेश वाघाडे यांना १०० किलो जय श्री राम तांदूळ देण्यात आला. तिसऱ्या लॉटरीत गोसू अजर्ुन नागपुरे यांच्यासह पाच जणांना नागझिरा अभयारण्यात सफारीला जाण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे चौथ्या लॉटरीत चंद्रकला रामचंद्र शिवणकर यांना २० किलो तूर डाळ देण्यात आली.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रमोद छगन कापगते यांना खाद्यतेलाचा डबा देण्यात आला. सहाव्या लॉटरीत प्रल्हाद महागु घरडे यांना चांदीचे नाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, सर्व करदात्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि मोफत दळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामसभेत राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि करवसुली जलद करण्यासाठी इतर ग्रामपंचायतींनीही अशा उपक्रमांचे अनुसरण करावे, असे ग्रामस्थांचे मत आहे. नाविन्य पूर्ण संकल्पना राबविल्यामुळे जिल्ह्यात खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम युवक मोडे यांच्यावर अभिनंदननाच्या वर्षाव होत आहे. तालुक्यातील नागरिकांनी मागणी केली आहे की, असे नाविन्यपूर्ण उपक्रम नगरपरिषद व इतर ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा राबवावे. यामुळे करदात्यांना प्रोत्साहन व उत्सुकता निर्माण होते.









