रेती चोरी पकडण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना घेराव
ज्या अवैध रेतीच्या टिप्पर, ट्रक किंवा ट्रॅक्टर मालकाने एन्ट्री दिली नसेल त्याच वाहनावर कारवाई केली जाते विशेष करून भंडारा पोलिसांची कारवाई फक्त ट्रॅक्टर चालकावरच होताना दिसत आहे व त्या कारवाईचा मोठा गवगवा केला जातो. ग्रामीण भागात तर सूर नदी व लहान मोठ्या नदी, नाल्यावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू आहे. होत असलेल्या रेती चोरीवर आळा घालण्यात प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना सुद्धा अजिबात यश आलेले नाही.आज पहाटेला खमारी येथीलच एका व्यक्तीने नायब तहसीलदार चांदेवार यांना भ्रमणध्वनीवर नदीपात्रातून रेती चोरी होत असल्याची सूचना दिली असता नायब तहसीलदार चांदेवार यांनी कर्मचाऱ्यांना फोन केले परंतु कोणीही उपलब्ध झाले नसल्याने ते एकटेच स्वतःच्या गाडीने खमारी येथे सकाळी सात वाजता पोहोचले असता रेतीचा एक ट्रॅक्टर जाताना दिसला. त्याचा पाठलाग केला असता तो महालगाव रस्त्याने पळुन जाताना त्याने रेती रस्त्यावरच पाडली तितक्यात समोरून टाटा पिकअप (डाला गाडी) आली. त्याला घासून ट्रॅक्टर सुसाट वेगात पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे टाटा पीक अप गाडीचे नुकसान झाले यावरून टाटा पीकअप च्या मालकाने नायब तहसीलदारांशी हुज्जत घालने सुरू केले असता १०० च्या जवळपास ग्रामीण तिथे जमा झाले. तुमच्या व पोलिसांच्या आशीर्वादानेच रेती चोरी सुरू आहे असा गावकऱ्यांचा आरोप होता.
खमारी चे पोलीस पाटील कुंवरलाल दमाहे यांनी समजुत काढुन परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला असता टाटा पिकप चा मालक जयपाल सव्वालाखे याने पोलीस पाटलासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की केली. थोड्याच वेळात मोहाडी पोलीस तेथे पोहोचले व त्यांनी प्रकरण शांत केले. या प्रकरणी नायबतहसीलदार सुखदेव चांदेवार यांच्या तक्रारीवरून आरोपी मालक सुरेंद्र माहुले (४५) आणि ट्रॅक्टर चालक शांतीलाल लिल्लारे (५०) रा. खमारी (बु.) यांच्या विरुध्द भा.न्या. संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९, मोटार वाहन अधिनियम ५०, १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस पाटील कुंवरलाल दमाहे यांच्या तक्रारीवरून आरोपी जयपाल सव्वालाखे (४२) रा. खमारी(बु.) विरोधात कलम १३२, १२१(१), भा.न्या.सं., शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा आणणे, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे उपनिरीक्षक कातिकराम दूधकावरा हे करीत आहेत.