अवकाळी व गारपिटीच्या नुकसानीचे विशेष बाब म्हणून सर्वेक्षण करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून पंचनामे करीत आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. शेतकऱ्यांवर ज्या ज्या वेळी संकट येते त्यावेळी राज्य शासन मदतीचा हात घेऊन पुढे असते. यापूर्वी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने दिली आहे. त्यासाठी शासनाचा ऋणी आहे. मात्र सध्या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. झालेल्या गारपीटीत शेतातील धान, गहू, हरभरा, भाजी आणि फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान शेतकऱ्यांनी डोळ्यादेखत बघितल्याचे या पत्रात मेंढे यांनी स्पष्ट केले आहे.

आलेल्या संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची आस आहे. शासनाने सर्वेक्षण करून बाधित क्षेत्राचे पंचनामे करावे आणि बाधितक्षेत्राची आकडेवारी जाहीर करावी. सोबतच विशेष बाब म्हणून या संपूर्ण परिस्थितीकडे बघावे आणि लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांना दिली जावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. आज हाताशी आलेले पीक नष्ट होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाची ही मदत दिलासा देणारी ठरेल असेही या पत्रात सुनिल मेंढे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *