“वेव्हज’ समिटमध्ये सहभागी होणार भंडारा जिल्ह्यातील मृगांक!
मृगांक वर्मा हे क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (२०२२) नेटवर्कचे वरिष्ठ सदस्य आहेत. २०२२ मध्ये, त्यांनी गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) “५३ तासांचा शॉर्ट फिल्म मेकिंग चॅलेंज’ स्पर्धा जिंकली होती, जी एनएफडीसी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शॉर्ट्स टीव्हीच्या सहकार्याने आयोजित केली होती. मृगांक वर्मा सध्या टीव्ही मालिका, लघुपट, वेब मालिका, जाहिरात चित्रपट इत्यादींच्या निर्मिती आणि संपादनात गुंतलेले आहेत. क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो नेटवर्कचे माजी सहभागी म्हणून, त्यांना मुंबईत होणाऱ्या या वेव्हज समिटमध्ये विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.
अलिकडच्या काळात भारत ओटीटी, ॲनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, फीचर फल्म्स, संगीत आणि डिजिटल मीडियामध्ये वेगाने प्रगती करत असताना आणि जगाचे “कंटेंट हब’ बनण्याच्या तयारीत असताना, वेव्हज प्लॅटफॉर्म उच्च-स्तरीय संभाषणे, प्रमुख जागतिक घोषणा, व्यवसाय आणि गुंतवणूक तसेच नेटवर्किंग, मनोरंजन उद्योगाशी जोडण्याची आणि जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या बारकाव्यांबद्दल जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले की, जगातील १०० हून अधिक देश ४ दिवसांच्या या शिखर परिषदेत सहभागी होतील. यामध्ये “वेव्हज बाजार’, “ग्लोबल मीडिया डायलॉग’ इत्यादी उपक्रमांची सुरुवात महत्त्वाच्या घोषणांसह केली जाईल आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली जाईल. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होईल.