अभिव्यक्तीचा गळा अवरुद्ध करण्याच्या काळात साहित्यिकांची जबाबदारी मोठी- डॉ. श्रीपाद जोशी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न सेन्सार बोर्डातील तथाकथित व्यक्ती विचारत असतील तर शासन ज्या संस्थांना अनुदान देते त्या संस्थेत असलेल्या व्यक्तींची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. सध्याच्या काळात अभिव्यक्तीचा गळा अवरुध्द करणे सुरू आहे. अशावेळी साहित्यिकांनी वैचारिक मशाली प्रज्ज्वलित करुन परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. ते स्प्रिंग डेल स्कूल भंडारा येथील ज्ञानदीप सभागृहात आयोजित वैनाकाठ फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली साहित्य अकादमीचे सदस्य ॲड. लखनसिंह कटरे हे होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वैनाकाठ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमृत बन्सोड, विदर्भ साहित्य संघ भंडारा शाखेचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे उपस्थित होते. कवी मुकुंदराज काव्य पुरस्कार कवी सुनील उबाळे, संभाजीनगर यांच्या “उलट्या कडीचं घर’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. कै. घनश्याम डोंगरे कथासंग्रह पुरस्कार लेखक प्रसाद कुमठेकर, वसई यांच्या “इतर गोष्टी’ कथासंग्रहाला देण्यात आला ना. रा. शेंडे कादंबरी पुरस्कार अशोक पवार, चंद्रपूर यांच्या “बेडा’ कादंबरीला देण्यात आला. डॉ. अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार डॉ. विनोद राऊत, वर्धा यांच्या “नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा’ या ग्रंथाला तर डॉ. आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार पुरुषोत्तम संबोधी,बेंगळूर यांच्या “धम्मक्रांतीची वाटचाल आणि प्रदुषणे’ या ग्रंथाला देण्यात आला. साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,फफळ व महावस्त्र देण्यात आले महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगडे, नागपूर यांना तर जे. पी. नाईक शिक्षणसाथी पुरस्कार यंग फाऊंडेशनचे संदीप देवरे, नंदुरबार यांना प्रत्येकी रोख अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र व फळ देवून सन्मानित करण्यात आले. साहित्य पुरस्कार प्राप्त कवी लेखक कादंबरीकार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना आपले साहित्य हे जीवनानुभवाचे सार असल्याचे सांगितले. विलास भोंगाडे यांनी गोसेखुर्द धरणाच्या लढ्यासोबतच सध्या सुरु असलेल्या दिडोंरी लढ्याची माहिती दिली.

आदिवासीच्या हक्कासाठी लढणारे संदीप देवरे यांनी सातपुड्याच्या भागात येण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून ॲड. लखनसिंह कटरे यांनी वैनाकाठ फाउंडेशनचे पुरस्कार अत्यंत पारदर्शकपणे दिले जात असल्याचे सांगून ग्रंथ परीक्षण समितीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक विवेक कापगते यांनी तर आभार नरेश आंबिलकर यांनी मानले. पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानपत्राचे वाचन आकाशवाणीच्या उद्घोषिकाविणा डोंगरवार, डॉ. कविता राजाभोज यांनी केले. ग्रंथ परीक्षकांच्यावतीने डॉ. रेणुकादास उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारांना अर्थसहाय्य मोहन मिरासे, संजय जांभुळकर, ईश्वर नाकाडे, सुनिता नितनवरे, संवेदना कापगते, मृणाल हुमणे, रोहित भोंगाडे यांनी केले. कार्यक्रमाला भगवान सुखदेवे, डॉ. दशरथ कापगते, शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, डॉ. के. एल. देशपांडे, डॉ. ममता राऊत, प्रभू राजगडकर, डॉ. जयश्री सातोकर, मंगला गणवीर, देवानंद घरत, प्रमोदकुमार अणेराव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बासप्पा फाये, रामेश्वर बागडे, रोशन कावळे, स्प्रिंग डेलच्या शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *