अमृत भारत रेल परियोजनेची खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पोलखोल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रेल्वे संदर्भाच्या आढावा बैठकीमध्ये भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी विभागीय रेल मंडल अधिकारी विजय कुमार गुप्ता आणि इतर रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक रेल विभागीय मंडल कार्यालय नागपूर येथे घेतली. या बैठकीत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली आणि रेल्वे विभागातील अनेक समस्या उघडकीस आल्या. अमृत भारत रेल परियोजनेवरील प्रश्न बैठकीत अमृत भारत रेल परियोजनेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. खासदार पडोळे यांनी सांगितले की, या प्रकल्पातील कामे केवळ लीपापोती स्वरूपाची आहेत. जुन्याच कामावर नवीन काम दाखवत आहेत. कामे अतिशय वेगाने केली जात आहेत, पण त्याचा दर्जा निकृष्ट आहे.

काही फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांनी रेल्वे विभागाची पोलखोल केली. तसेच, रेल्वेचे बांधकाम जुने असून त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. रेल्वे हॉस्पिटलच्या सुविधांवरील चिंता रेल्वे विभागाकडे स्वतंत्र १८५ बेडचे हॉस्पिटल असूनही, त्यात अनेक आवश्यक सुविधा नसल्यामुळे रेल्वे कर्मचारी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. यावर खासदार पडोळे यांनीआपली खंत व्यक्त केली. गोंदिया ते बल्लारशहा नवीन रेल्वे ट्रक आणि सौंदड ओवर ब्रिज गोंदिया ते बल्लारशहा दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहे, मात्र सौंदड येथील ओवर ब्रिजचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या कामाच्या विलंबाबाबत खासदारांनी विभागीय अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.

पाणी साठवण आणि जलसंधारणासाठी रेल्वेचे प्रयत्न रेल्वे जवळ देशातील सर्वाधिक जागा असूनही, पाणी साठवण (वॉटर हार्वेस्टिंग) यंत्रणा नाही. खासदार पडोळे यांनी रेल्वेने पुढाकार घेऊन सर्व रेल्वे स्थानक व इमारतींमध्ये जलसंधारणासाठी वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत रेल्वे विभागातील कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, कामे नियोजित आणि दर्जेदार पद्धतीने करावीत, तसेच कर्मचारी सुविधा सुधारण्याच्या बाबतीतही योग्य तो विचार करावा, असे निर्देश खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले आहेत. रेल्वेच्या विकासासाठी आणि कर्मचारी कल्याणासाठी पुढील काळातही असे आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *