शिकारीसाठी पाठलाग करणाऱ्या वाघाचा विहिरीत पडून मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील चिखला या गावात एका वाघिणीने शिकारीसाठी रानडुक्कराचा पाठलाग केला. पण यावेळी अंदाज चुकल्याने वाघीण आणि रानडुक्कर थेट विहिरीत पडले. विहिरीतून बाहेर न पडता आल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस येताच ग्रामस्थानी घटनास्थळी एकच गर्दी केली. तुमसर वन परिक्षेत्राच्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिखला गावाबाहेर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर एक मोठी विहीर आहे. आज सकाळी काही ग्रामस्थ विहिरीच्या बाजूने जात असताना दुर्गंधीमुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच गोबरवाही ठाण्याचे ठाणेदार शरद शेवाळे तात्काळ घटनेस्थळी पोहचले. ठाणेदार शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वाघीण रानडुकराचा पाठलाग करत असताना ते दोघेही विहिरीत पडले असावे.

विहिरीत पडल्यानंतर वाघीण आणि डुक्कर दोघेही शिकारीची घटना विसरले. विहिरीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी दोघेही धडपडू लागले. त्यातच वाघाचे समोरील नखेही तुटली असावीत. अंदाजे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी. विहिरीतून बाहेर न पडता आल्याने दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या वाघीण आणि डुकराला माशा भिनभिणत होत्या. शिवाय दुर्गंधीही पसरली होती. वाघीण आणि डुकराला विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *