एस. टी. बस अपघातात महिलेचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- बपेरा तिरोडा बसला अपघात होऊन चिखला येथील ३१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १६ मार्च रोजी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास वाहणी येथे पाण्याच्या टाकीजवळ घडली. या अपघातात मृतक महिलेचा पती व २ मुली सुरक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे.आरोपी चालक निळकंठ साधू मेश्राम वय ३८ वर्ष राहणार कारूटोला जिल्हा गोंदिया यांचेवर पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमेश्वर हरिचंद कडू वय ४० वर्षे राहणार चिखला हा आपले दुचाकी क्रमांक एम एच ३६ ये ४०१ ने तिरोडा तालुक्यातील सरांडी येथून आपल्या गावाकडे आपली पत्नी मीना वय ३१ वर्षे व दोन लहान मुलीसोबत जात असतांना समोरून येणाऱ्या एसटी बस क्र. एम. एच. ०६ एस ८८६० च्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रस्त्याच्या कडेला गाडी खाली उतरवित असतांना स्लीप झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते. फिर्यादीने दिलेल्या लेखी रिपोर्ट वरून व पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार यांनी दिलेल्या आदेशावरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतला आहे.