तुमसर येथे भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी
भव्य जनजागृती रैली; आदिवासी गुणवंत, कलावंत व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तुमसर येथे ‘जनजातीय गौरव दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांच्या वतीने शकुंतला सभागृहात आयोजित या कार्यक्रमािमित्त भव्य जनजागृती रैलीसह विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षण, कला, साहित्य, क्रीडा, शेती व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदिवासी गुणवंतांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमचे उद्घाटन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजु कारेमोरे यांच्या हस्ते, तर सहउद्घाटन विधान परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या उपस्थितीत होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनने करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, तुमसर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सागर गभने, उपाध्यक्ष सचिन बोपचे, नगरसेवक योगेश सिडाम, बिसन सयाम, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक उईके व नारायण वरठे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे आणि आदिवासी कर्मचारी संघटनेचे कार्यध्यक्ष रोहित मरस्कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात जनजागृती रैली मुलींच्या वसतिगृहापासून जनजागृती रैलीला सुरुवात झाली. पारंपरिक आदिवासी वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि जनजागृतीपर घोषणांनी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत रैलीचा समारोप शकुंतला सभागृहात झाला. या रैलीमध्ये आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी, शिक्षक, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आदिवासी गुणवंतांचा सम्मान कार्यक्रमात आश्रमशाळा व वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांसह एमपीएससी, यूपीएससी, एमबीबीएस व उच्च शिक्षण क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच पारंपरिक आदिवासी नृत्य, संगीत, वाद्यवादन व लोककलेच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन करणारे कलावंत, बोलीभाषा संवर्धनासाठी कार्यरत कवी, लेखक, चित्रकार व शिल्पकार यांचाही सन्मान करण्यात आला.
जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू, आधुनिक व सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणारे प्रगतिशील शेतीकरी तसेच आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त व्यक्तींनाही यावेळी गौरविण्यात आले. यासोबतच आदिवासी कागणारे व कलाकार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक सक्षमनीकरण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडाराचे प्रकल्प अधिकारी दीपक मा. हेडाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.








